

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंडया मागील शुक्लकाष्ठ कायम राहिले आहे. यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2024) हंगाम त्याच्यासह संघासाठीही अत्यंत निराशाजनक ठरला. त्याच्या नेतृत्त्वाखाली संघाने १४ पैकी केवळ चार सामने जिंकले. अखेरच्या सामन्यातही अडचणींनी त्याची पाठ सोडली नाही. शुक्रवारी लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध मुंबईचा १८ धावांनी पराभव झाला. त्याचबरोबर संघाच्या स्लो ओव्हर रेटसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हार्दिकला30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याला एका सामन्यासाठी निलंबितही करण्यात आले आहे. त्यामुळे आता तो पुढील आयपीएलमधील पहिल्या सामन्यालाही मुकणार आहे.
आयपीएलने एका निवेदनात म्हटले आहे की, ३० लाख रुपयांच्या दंडाव्यतिरिक्त, आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल हार्दिकवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. या मोसमात मुंबईचे कोणतेही सामने शिल्लक नाहीत आणि संघाने आपले सर्व 14 सामने गट टप्प्यात खेळले आहेत, त्यामुळे हार्दिकवरील हे निलंबन पुढील हंगामासाठी लागू असेल आणि तो 2025 च्या हंगामातील पहिला सामना खेळू शकणार नाही. . हार्दिक व्यतिरिक्त, प्लेइंग-11 मध्ये समाविष्ट असलेल्या संघातील इतर खेळाडूंना 12 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड प्रभावित खेळाडूंनाही लागू होईल. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतलाही एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले होते.
यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबईने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्समध्ये घेऊन संघात मोठा बदल केला. हार्दिक बराच काळ मुंबईचा भाग होता, परंतु 2022 च्या मोसमासाठी मोठ्या लिलावापूर्वी गुजरातने हार्दिकला आपला कर्णधार बनवले. त्याने पहिल्याच मोसमात संघाला विजेतेपद मिळवून दिले होते, तर गेल्या मोसमात गुजरात उपविजेता होता. मात्र, या हंगामापूर्वीच हार्दिकने गुजरात सोडून जुन्या फ्रँचायझीमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. मुंबईने रोहितच्या जागी हार्दिकला कर्णधार बनवले, पण त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईची कामगिरी खूपच निराशाजनक होती. मुंबई संघ 14 सामन्यांत चार विजय आणि 10 पराभवांसह 8 गुणांसह तळाच्या दहाव्या स्थानावर राहिली.