केएल राहुलने अत्यंत संयमी फलंदाजी करत एका बाजूने किल्ला लढवला. सामना संपल्यानंतर राहुलला 'गेम चेंजर ऑफ द मॅच'चा बहुमान मिळाला. 
स्पोर्ट्स

KL Rahul : सामना जिंकलाच त्याचबरोबर केएल राहुलने जिंकली उपस्थितांची मनं! दुसऱ्या वनडे सामन्‍यानंतर नेमकं काय घडलं?

केएल राहुल मालिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यात ठरला 'गेम चेंजर ऑफ द मॅच'चा मानकरी

पुढारी वृत्तसेवा

KL Rahul Smartphone Gift Stadium Staff : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला असला, तरी मैदानावरील कामगिरीपेक्षा एका वेगळ्याच घटनेमुळे यष्टीरक्षक-फलंदाज केएल राहुलने सर्वांची मने जिंकली आहेत. केएल राहुलची सामना संपल्यानंतरची एक कृती सर्वच क्रिकेटप्रेमींचे मन जिंकणारी ठरली.

केएल राहुल ठरला 'गेम चेंजर ऑफ द मॅच'चा मानकरी

वनडे मालिकेतील दुसरा सामना भारतीय संघासाठी अत्यंत संघर्षपूर्ण रहिला. एकीकडे फलंदाज झटपट बाद होत असताना, राहुलने अत्यंत संयमी फलंदाजी करत एका बाजूने किल्ला लढवला. सामना संपल्यानंतर राहुलला 'गेम चेंजर ऑफ द मॅच'चा बहुमान मिळाला.

राहुल आणि श्रेयस यांनी पाचव्या विकेटसाठी केली ४६ धावांची भागीदारी

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा पूर्ण संघ १३४ धावांवर गारद झाला. भारताकडून गुरनूर ब्रारने ४ बळी घेत मोलाची कामगिरी बजावली. मात्र, या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांची दमछाक झाली. कर्णधार शुभमन गिल पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला, तर विराट कोहली (७) आणि रोहित शर्मा (२३) स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी पाचव्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अय्यरने ३० धावांचे योगदान दिले, तर राहुल २६ धावांवर नाबाद राहिला. भारताची धावसंख्या २६ षटकांत ७ बाद ११३ असताना पावसाने हजेरी लावली. त्यावेळी भारत 'डकवर्थ-लुईस' नियमानुसार ४ धावांनी पुढे होता. त्यामुळे भारताला ४ धावांनी विजयी घोषित करण्यात आले. या विजयासह भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.

केएल राहुलने जिंकली उपस्थितांची मनं!

सामना संपल्यानंतर राहुलला 'गेम चेंजर ऑफ द मॅच'चा बहुमान मिळाला. मात्र यावेळी पुरस्कारातून मिळालेला स्मार्टफोन केएल राहुलने स्वतःकडे ठेवला नाही, त्याने हा स्मार्टफोन वेलिंग्टन येथील हेन्री स्टेडियमवरील एका महिला कर्मचाऱ्याला भेट म्हणून दिला. पडद्यामागे राहून मेहनत करणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी राहुलने दाखवलेले हे औदार्य सध्या क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.

तिसऱ्या सामन्यात फलंदाजी सुधारण्याचे आव्हान

भारताने सामना जिंकला असला, तरी अवघ्या १३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना उडालेली दाणादाण संघासाठी चिंतेची बाब आहे. गोलंदाजांनी सामना हातात आणून दिला असताना अव्वल आणि तळप्यातील फलंदाजांच्या अपयशामुळे भारताला पावसाची मदत घ्यावी लागली. आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना १० नोव्हेंबर रोजी हॅमिल्टन येथे खेळवला जाणार आहे. भारताकडे मालिका ३-० ने जिंकण्याची संधी असली, तरी फलंदाजीत सुधारणा करण्याचे मुख्य आव्हान भारतीय संघासमोर असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT