IPL 2026 Points Table: कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएल २०२६ मध्ये जोरदार पुनरागमन करत सलग चौथा विजय मिळवला आहे. सुरुवातीचे सहा सामने जिंकण्यात अपयशी ठरलेली KKR आता प्लेऑफच्या शर्यतीत पुन्हा दमदारपणे उतरली आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात KKR ने दिल्ली कॅपिटल्सला सहज पराभूत केले.
या सामन्यात KKR चा कर्णधार अजिंक्य रहाणे याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी चांगली असलेल्या खेळपट्टीवर दिल्लीची सुरुवात ठीक झाली होती. केएल राहुल आणि पथुम निसांका यांनी पहिल्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. निसांकाने अर्धशतक झळकावले, तर राहुलने २३ धावा केल्या.
मात्र त्यानंतर दिल्लीची मधली फळी पुन्हा एकदा कोसळली. अक्षर पटेलला २२ चेंडूत फक्त ११ धावा करता आल्या. याशिवाय नितीश राणा ८, समीर रिजवी ३ आणि ट्रिस्टन स्टब्स २ धावांवर बाद झाले. त्यामुळे दिल्लीला २० षटकांत केवळ १४२ धावांपर्यंत मजल मारता आली.
हे लक्ष्य KKR ने अवघ्या १४.२ षटकांत म्हणजे ३४ चेंडू राखून पूर्ण केले. या विजयामुळे कोलकात्याच्या नेट रनरेटमध्येही सुधारणा झाली आहे.
या विजयासह KKR आता गुणतालिकेत सातव्या स्थानावर पोहोचली आहे. कोलकात्याने १० पैकी ४ सामने जिंकले असून ५ सामने गमावले आहेत, तर एक सामना रद्द झाला होता. संघाच्या खात्यात आता ९ गुण झाले आहेत.
दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सची परिस्थिती अधिक कठीण झाली आहे. दिल्ली आता आठव्या स्थानावर घसरली असून संघाच्या खात्यात ८ गुण आहेत. दिल्लीच्या खाली मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ आहेत. दोघांचेही ६-६ गुण आहेत.
दिल्ली, मुंबई आणि लखनौ या तिन्ही संघांसाठी आता परिस्थिती अत्यंत अवघड झाली आहे. हे संघ उर्वरित सर्व सामने जिंकले तरी जास्तीत जास्त १४ गुणांपर्यंतच पोहोचू शकतील. त्यामुळे त्यांचे भवितव्य आता इतर अव्वल संघांच्या निकालांवर अवलंबून राहणार आहे. अधिकृतरीत्या कोणताही संघ अजून स्पर्धेबाहेर गेलेला नसला तरी दिल्लीसाठी प्लेऑफचा मार्ग जवळपास बंद झाल्याचे चित्र आहे.
सनरायझर्स हैदराबाद १४ गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे. पंजाब किंग्स १३ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या तिन्ही संघांचे प्रत्येकी १२ गुण आहेत. नेट रनरेटच्या आधारावर आरसीबी तिसऱ्या, राजस्थान चौथ्या आणि गुजरात पाचव्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्स १० गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.