DC vs KKR | फिन अ‍ॅलनचे तुफानी नाबाद शतक

‘केकेआर’चा दिल्ली कॅपिटल्सवर 8 गडी राखून दणदणीत विजय
DC vs KKR |
DC vs KKR | फिन अ‍ॅलनचे तुफानी नाबाद शतक
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : येथील अरुण जेटली स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या ‘आयपीएल’च्या 51 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) यजमान दिल्ली कॅपिटल्सवर (डीसी) 8 गडी राखून दणदणीत विजय नोंदवला.

कोलकात्याच्या विजयाचा शिल्पकार ठरला, तो सलामीवीर फिन अ‍ॅलन. त्याने दिल्लीच्या गोलंदाजीची पिसे काढत अवघ्या 47 चेंडूंत नाबाद 100 धावांची खेळी केली. ‘केकेआर’ने दिल्लीने विजयासाठी दिलेले 143 धावांचे आव्हान अवघ्या 14.2 षटकांत पूर्ण केले. या विजयामुळे कोलकाताने गुणतालिकेत आपली स्थिती अधिक भक्कम केली आहे.

दिल्लीची फलंदाजी ढेपाळली

नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा कोलकाताचा निर्णय सार्थ ठरला. दिल्लीची सुरुवात चांगली झाली होती, सलामीवीर पाथुम निसांका (50) आणि के. एल. राहुल (23) यांनी 4.6 षटकांत 49 धावा जोडल्या. मात्र, राहुल बाद झाल्यानंतर दिल्लीच्या डावाला गळती लागली. मधल्या फळीत नितीश राणा (8), समीर रिझवी (3) आणि ट्रिस्टन स्टब्स (2) स्वस्तात बाद झाले. आशुतोष शर्माने 39 धावांचे योगदान दिल्यामुळे दिल्लीला 20 षटकांत 8 बाद 142 धावांपर्यंत मजल मारता आली. कोलकात्याकडून अनुकुल रॉयने सर्वाधिक 3 बळी घेतले.

फिन अ‍ॅलनची तुफानी नाबाद शतकी खेळी

विजयासाठी 143 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवातही खराब झाली. अजिंक्य रहाणे (13) आणि अंगक्रिश रघुवंशी (1) झटपट बाद झाल्याने ‘केकेआर’ची अवस्था 3.4 षटकांत 2 बाद 31 अशी झाली होती; पण त्यानंतर फिन अ‍ॅलनने मैदानावर अक्षरशः वादळ आणले. त्याने 5 चौकार आणि तब्बल 10 षटकार ठोकत 14.2 षटकांतच सामना संपवला. त्याला कॅमेरून ग्रीनने (27 चेंडूंत नाबाद 33) सुंदर साथ दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news