भागलपूर/गया (बिहार) : अपेक्षेप्रमाणे 7 व्या खेलो इंडिया तिरंदाजीसह मल्लखांब प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सुवर्णपदकाकडे वाटचाल कायम राखली आहे. तिरंदाजीत महाराष्ट्राचे सात खेळाडू पदकासाठी भिडणार असून, यातील सहा पदके, तर आताच निश्चित आहेत. मल्लखांबमध्येही लौकिकाला साजेशी कामगिरी करीत सांघिक प्रकारात मुलांनी आघाडी घेतली आहे. खो-खोत पंजाबचा 58-9 गुणांनी धुव्वा उडवून महाराष्ट्राच्या मुलींनी विजयी सलामी दिली.
भागलपूर येथे सुरू असलेल्या तिरंदाजी स्पर्धेत सलग दुसरा दिवस महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गाजविला. मुलींच्या तिरंदाजीच्या कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या तेजल साळवे व प्रीतिका प्रदीप यांच्यामध्ये अंतिम लढत रंगणार असून, महिलांच्या रिकर्व प्रकारातही शर्वरी शेंडे व वैष्णवी पवार या महाराष्ट्रीय प्रतिस्पर्ध्यांमध्येच सुवर्णपदकाची लढत रंगणार आहे. म्हणजेच ही चारही पदके महाराष्ट्राच्याच झोळीत पडणार आहेत.
याचबरोबर मुलांच्या रिकर्व प्रकारात महाराष्ट्राच्या उज्ज्वल ओलेकरने अंतिम फेरी गाठली असून, मुलांच्या कंपाऊंड प्रकारातही मानव जाधव अंतिम फेरीत दाखल झाला आहे. म्हणजेच महाराष्ट्रासाठी ही दोन पदकेही निश्चित झाली आहेत. मुलींच्या कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राची वैदेही जाधव कांस्यपदकासाठी लढणार आहे. हेही पदक मिळाले, तर तिरंदाजीत महाराष्ट्राला सात पदके मिळतील.
ऐतिहासिक गया शहरातील आयआयएम संस्थेच्या सभागृहात सुरू असलेल्या सांघिक मल्लखांब प्रकारात महाराष्ट्राने आपली आघाडी कायम राखली आहे. सुवर्णपदकासाठी महाराष्ट्रासमोर मध्य प्रदेश, तामिळनाडू व छत्तीसगड संघांचे आव्हान असणार आहे. आयुष काळंगे, निशांत लोखंडे, ओम गाढवे, निरंजन अमृते, आर्यन आबोडकर व प्रज्ञेश तावडे यांच्या संघाने सांघिक मल्लखांबच्या तिन्ही प्रकारांत संध्याकाळच्या सत्रापर्यंत आघाडी कायम राखली होती. अनुभवी आयुष काळंगे व निशांत लोखंडे यांनी सलग दुसर्या खेलो इंडिया स्पर्धेतील पदकासाठी प्रदर्शन केले. प्रथमच खेलो इंडिया स्पर्धेत खेळणार्या ओम गाढवे व निरंजन अमृते यांनी तिन्ही प्रकारांत लक्षवेधी प्रदर्शन करीत पदकाकडे वाटचाल सुरू ठेवली आहे.
खो-खोच्या मैदानातही सलग 7 व्या स्पर्धेत सुवर्णपदकासाठी महाराष्ट्राने वाटचाल सुरू केली आहे. मुलींच्या गटात पंजाबचा 58-9 गुणांनी पराभव करीत महाराष्ट्राच्या मुलींनी विजयी सलामी दिली. तन्वी भोसले, विश्वकरंडक विजेती अश्विनी शिंदे, दिव्या पाल्य, सरिता दिवा यांनी अष्टपैलू खेळी करीत दणदणीत विजय संपादन केला.