Bengaluru stampede (file photo)
स्पोर्ट्स

Bengaluru stampede | व‍िराट कोहली अडचणीत! बंगळूर चेंगराचेंगरीला RCB जबाबदार, कर्नाटक सरकारकडून हायकोर्टात रिपोर्ट सादर

बंगळूरमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर ४ जून रोजी आयपीएल विजयी परेडदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांना जीव गमवावा लागला होता

दीपक दि. भांदिगरे

Bengaluru stampede

बंगळूरमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर ४ जून रोजी आयपीएल विजयी परेडदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेला कर्नाटक सरकारने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ला जबाबदार धरले आहे. या चेंगराचेंगरीच्या घटनेत ११ जणांना जीव गमवावा लागला. तर ३० हून अधिक लोक जखमी झाले होते.

याबाबतचा अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे. या अहवालातून कर्नाटक सरकारने अनेक त्रुटी निदर्शनास आणून दिल्या आहेत. यात क्रिकेटपटू विराट कोहलीच्या नावाचाही उल्लेख केला आहे. विराटने केलेल्या सार्वजनिक व्हिडिओचा यात समावेश आहे. पोलिसांनी या इव्हेंटसाठी परवानगी नाकारली होती. पण तरीही प्रचंड गर्दी जमली, असे त्यात म्हटले आहे.

या इव्हेंटचे आयोजक असलेल्या डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क्स प्रायव्हेट लिमिटेडने ३ जून रोजी नियोजित विजयी परेडविषयी पोलिसांना केवळ कळवले होते. पण २००९ च्या शहर आदेशानुसार, अशा इव्हेंटसाठी औपचारिक परवानगी अनिवार्य आहे. जी घेतली नव्हती. या आधारावर, पोलिसांनी इव्हेंटला परवानगी दिली नाही.

दरम्यान, आरसीबीने इव्हेंटचे प्रमोशन सुरू ठेवले. ४ जून रोजी आरसीबीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वांना इव्हेंटला येण्याचे आवाहन केले. एका पोस्टमध्ये विराट कोहलीचा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना इव्हेंटला उपस्थित राहण्याचे आवाहन करणारा होता. ज्यात या इव्हेंटसाठी मोफत प्रवेश असल्याचे म्हटले आहे. यामुळे विराट कोहली आणि आरसीबी विजयी संघाची एक झलक पाहण्यासाठी तीन लाखांहून अधिक चाहत्यांची गर्दी जमली, असे राज्य सरकारने म्हटले आहे.

या इव्हेंटच्या दिवशी गोंधळात आणखीच भर पडली, जेव्हा दुपारी ३.१४ वाजता, आयोजकांनी अचानक जाहीर केले की स्टेडियममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पास लागेल. शेवटच्या क्षणी जाहीर केलेल्या या निर्णयामुळे गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली.

एंट्री गेट्स लवकर उघडले नाहीत, अन्...

या अहवालात असेही म्हटले आहे की आरसीबी, डीएनए एंटरटेनमेंट आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) यांच्यात कसलाही समन्वय दिसून आला नाही. एम चिन्नास्वामी स्टेडियमच्या प्रवेशद्वारांवर चुकीच्या पद्धतीने नियोजन करण्यात आले. तसेच ते उघडण्यास विलंब झाला. यामुळे गोंधळ उडाला. परिणामी, चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत गर्दी नियंत्रणात आणताना सात पोलिस कर्मचारी जखमी झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT