Kane Williamson:
न्यूझीलंडचा महान फलंदाज आणि माजी कर्णधार केन विल्यमसन याने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. टी२० विश्वचषक २०२६ च्या अवघ्या चार महिने आधी विल्यमसनने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मात्र, तो न्यूझीलंडसाठी एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खेळणे सुरू ठेवणार आहे.
'ब्लॅककॅप्स'चा दीर्घकाळ कर्णधार राहिलेल्या विल्यमसनने टी२० फॉरमॅटमधून बाहेर पडताना सांगितले की, "माझ्यासाठी आणि संघासाठी ही योग्य वेळ आहे." ९३ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २५७५ धावा करून तो न्यूझीलंडसाठी या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. विल्यमसनने टी२० विश्वचषक २०२४ नंतरच संघात आपला सहभाग कमी केला होता आणि आता त्याने संघाची जबाबदारी मिचेल सँटनरकडे सोपवली आहे.
विल्यमसनने ७५ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये न्यूझीलंडचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने या फॉरमॅटमध्ये जबरदस्त सातत्य दाखवले. २०१६ आणि २०२२ मध्ये टी२० विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली होती. २०२१ मध्ये टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत मजल मारली होती. विल्यमसन संघाला टी२० विश्वचषक जिंकून देऊ शकला नाही, पण त्याने न्यूझीलंडला सातत्याने उच्च स्तरावर खेळण्यासाठी प्रेरित केले.
विल्यमसन म्हणाला की, "आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमधून निवृत्त होण्याची ही योग्य वेळ आहे." त्याच्या मते, या निर्णयामुळे २०२६ मध्ये भारत-बांगलादेशमध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी तयारी करणाऱ्या संघाला भविष्याची स्पष्टता मिळेल. "टी२० मध्ये बरीच प्रतिभा आहे आणि पुढील काळात या खेळाडूंना तयार करणे महत्त्वाचे आहे. मिच सँटनर एक चांगला कर्णधार आहे. आता संघाला पुढे नेण्याची त्याची वेळ आहे आणि मी त्यांना पाठिंबा देईनच," असे विल्यमसनने स्पष्ट केले.
विल्यमसन जगभरातील टी२० फ्रँचायझी लीग खेळणे सुरू ठेवणार असला तरी, त्याने आयपीएलमधील आपल्या खेळण्याच्या भूमिकेत मोठा बदल केला आहे. नुकताच तो लखनऊ सुपर जायंट्सचा रणनीतिक सल्लागार (strategic advisor) म्हणून सामील झाला, ज्यामुळे इंडियन प्रीमियर लीगमधील त्याची फलंदाज म्हणून कारकीर्द संपुष्टात आल्याचे मानले जात आहे.