Womens World Cup 2025 | लोहा गरम है, मार दो हातोडा!

भारत की दक्षिण आफ्रिका फैसला आज?
Womens World Cup 2025
Womens World Cup 2025 | लोहा गरम है, मार दो हातोडा!
Published on
Updated on

नवी मुंबई; वृत्तसंस्था : 1983 च्या विश्वविजयाची पुनरावृत्ती करण्याची सुवर्णसंधी... आयसीसी विजेतेपदाचा वर्षानुवर्षांचा दुष्काळ संपवण्याचा द़ृढनिश्चय... आणि समोर बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचे आव्हान! हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ आज आयसीसी विश्वचषकाच्या फायनलमध्ये उतरेल, त्यावेळी संपूर्ण देश एका नव्या इतिहासाच्या प्रतीक्षेत पाहत असेल, ती म्हणजे झळाळत्या आयसीसी महिला विश्वचषक जेतेपदावर मोहोर उमटवण्याची! यंदा एका नव्या विश्वविजेत्याचा उदय निश्चित असून, भारताने विजय मिळवल्यास हा विजय देशातील महिला क्रिकेटमध्ये हा अभूतपूर्व क्रांती घडवू शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय रणरागिणींनी मिळवलेला विजय भल्याभल्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा होता. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धही आणखी एक घाव विश्वजेतेपदावर आपली मोहोर उमटवण्यासाठी पुरेसा असेल... ‘लोहा गरम है, मार दो हातोडा’!

भारतीय पुरुष संघाच्या 1983 मधील ऐतिहासिक विश्वविजयाची आठवण करून देणारा एक महत्त्वपूर्ण क्षण भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात समीप आला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ रविवारी येथे होणार्‍या महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा सामना करताना आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी महत्त्वाकांक्षी असणार आहे. विश्वचषकाच्या 13 व्या पर्वात नवीन विजेता मिळणार हे निश्चित आहे. तिसर्‍यांदा अंतिम फेरीत पोहोचलेला भारत आणि प्रथमच अंतिम फेरीत दाखल झालेला दक्षिण आफ्रिका, हे दोन्ही संघ येथे विजय खेचून आणण्यासाठी निर्धाराने मैदानात उतरतील.

यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेल्या जिगरबाज विजयाच्या बळावर भारतीय संघाने या स्पर्धेत नवी जान भरली. जेमिमा रॉड्रिग्जची नाबाद 127 धावांची अविस्मरणीय खेळी आणि हरमनप्रीतच्या लढाऊ 89 धावांमुळे भारताने पुन्हा एकदा अंतिम फेरीत धडक मारली आहे; आता तोच धडाका द. आफ्रिकेविरुद्ध कायम राखण्याचा संघाचा प्रयत्न असणार आहे. 2017 वन डे विश्वचषकाच्या फायनलमध्ये इंग्लंडकडून झालेला 9 धावांनी पराभव भारतासाठी प्रदीर्घ काळ सलणारा ठरला. पुढे भारताला 2023 टी-20 विश्वचषक सेमीफायनल आणि 2022 राष्ट्रकुल सुवर्णपदकाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धचेपराभव पत्करावे लागले होते. मात्र, यंदा भारताने उपांत्य लढतीत ऑस्ट्रेलियाचा अडसर पार करत त्यांच्याविरुद्धचे दोन्ही हिशेब चुकते केले. आता निर्णायक टप्प्यात द. आफ्रिकेविरुद्ध बाजी मारत विश्वचषक जेतेपदावर शिक्कामोर्तब करण्याचे भारताचे प्रयत्न असणार आहेत.

भारताने ऑस्ट्रेलियावर मात केली असली तरी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या आघाड्यांवर भारताची कामगिरी अगदीच सुमार दर्जाची होती. वेगवान गोलंदाज क्रांती गौड आणि रेणुका सिंग ठाकूर यांना लय सापडली नाही, तर कर्णधार हरमनप्रीतनेही एक सोपा झेल सोडला. वास्तविक, फलंदाजीला अनुकूल खेळपट्ट्यांवर गोलंदाजांवर अर्थातच मर्यादा असतात. मात्र, स्पर्धेत सर्वाधिक 17 बळी घेणारी दीप्ती शर्मा भारताच्या यशासाठी पुन्हा एकदा महत्त्वाची ठरेल.

दक्षिण आफ्रिकन संघावर यंदा गुवाहाटीत इंग्लंडविरुद्ध 69 धावांवर तर इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 97 धावांवर सर्वबाद होण्याची नामुष्की आली. मात्र, यानंतरही त्यांनी धीरोदात्त खेळावर भर देत अंतिम फेरीत धडक मारली आहे. अनुभवी मारिझान कॅप (204 धावा, 12 बळी), नादिन डी क्लर्क (190 धावा, 8 बळी), ताझमिन ब्रिटस् (212 धावा), क्लो ट्रायॉन (167 धावा, 5 बळी) आणि कर्णधार लॉरा वोल्वार्ड (470 धावा) या सर्वांनी निर्णायक कामगिरी केली आहे.

‘त्या’ 3 पराभवांचा वचपा काढण्याची नामी संधी

भारतीय महिला संघाला आयसीसी वन डे विश्वचषक स्पर्धेतील मागील तीनही सामन्यांत 2017, 2022 व 2025 दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव पत्करावे लागले आहेत. आज या आयसीसी विश्वचषक फायनलच्या सर्वोच्च पटलावर त्याचा हिशेब चुकता करण्याची नामी संधी भारतीय महिला संघाकडे असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news