

Women’s World Cup Final : १९८३ हे वर्ष भारतीय क्रिकेटच्या इतिहासाला कलाटणी देणारे ठरले. स्वतंत्र भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथमच विश्वचषकावर आपले नाव कोरले. आजही देशभरातील प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या हृदयात तो क्षण अभिमानाने जपलेला आहे. यानंतर पुन्हा विश्वचषक जिंकण्यासाठी २०११ पर्यंत वाट पाहावी लागली. आता भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारत पुन्हा एकदा विश्वचषकाचे स्वप्न देशवासीयांना दाखवले आहे.
महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ चा अंतिम सामना रविवार, २ नोव्हेंबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगणार आहे. महिला विश्वचषकात भारतीय संघ तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे.
महिलांच्या स्पर्धेत भारताला मागील दोन्ही फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळेच आता कपिल देव आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यानंतर हरमनप्रीत कौर विश्वचषक उंचावणार का, याकडे देशवासीयांचे लक्ष वेधले आहे.२००५ आणि २०१७ मध्ये मिताली राजच्या नेतृत्वाखाली शक्य न झालेली कामगिरी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखालील संघ करणार का, याकडे देशवासीयांचे लक्ष वेधले आहे. भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचे मोठे आव्हान आहे. विशेष म्हणजे, दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने पुरुष किंवा महिला कोणताही विश्वचषक अद्याप जिंकलेला नाही.
वर्ष : १९८३ कर्णधार: कपिल देव प्रतिस्पर्धी संघ :वेस्ट इंडिज निकाल : भारत ४३ धावांनी विजयी
वर्ष : २००३ कर्णधार: सौरव गांगुली प्रतिस्पर्धी संघ :ऑस्ट्रेलिया निकाल : भारत १२५ धावांनी पराभूत
वर्ष : २००५ (महिला) कर्णधार: मिताली राज प्रतिस्पर्धी संघ :ऑस्ट्रेलिया निकाल : भारत ९८ धावांनी पराभूत
वर्ष : २०११ कर्णधार: महेंद्रसिंह धोनी प्रतिस्पर्धी संघ :श्रीलंका निकाल :भारत ६ विकेट्सनी विजयी
वर्ष :२०१७ (महिला) कर्णधार: मिताली राज प्रतिस्पर्धी संघ : इंग्लंड निकाल : भारत ९ धावांनी पराभूत
वर्ष :२०२३ कर्णधार: रोहित शर्मा प्रतिस्पर्धी संघ : ऑस्ट्रेलिया निकाल : ऑस्ट्रेलिया ६ विकेट्सनी विजयी
एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात, पुरुष असो वा महिला — भारतीय संघाला सर्वात कठीण आव्हान हे ऑस्ट्रेलियाच्या संघाचेच असते.आता भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे.१९८३ मध्ये कपिल देव आणि २०११ मध्ये एम. एस. धोनी यांनी केलेल्या पराक्रमाची पुनरावृत्ती हरमनप्रीत कौर करणार का? या प्रश्नाचे उत्तर रविवार, २ नोव्हेंबर रोजी मिळणार आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि अनुभवी फलंदाज हरमनप्रीत कौर ही जेतेपदाच्या सामन्यात इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे.ती स्पर्धेची ‘सिक्सर क्वीन’ होण्यापासून फक्त दोन पावले दूर आहे.हरमनप्रीत सध्या महिला एकदिवसीय विश्वचषक इतिहासातील सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहे.तिने ३४ सामन्यांमध्ये एकूण २२ षटकार मारले आहेत. वेस्ट इंडिजची अष्टपैलू डिएंड्रा डॉटिनने २९ सामन्यांमध्ये २२ षटकार मारले आहेत.न्यूझीलंडची दिग्गज सोफी डेव्हाईनने ३२ सामन्यांमध्ये २३ षटकार मारत या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.३६ वर्षीय हरमनप्रीतला डेव्हाईनला मागे टाकण्यासाठी फक्त दोन षटकारांची गरज आहे.इंग्लंडविरुद्धच्या विश्वचषक पराभवानंतर डेव्हाईनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.