Justin Greaves 5 Wickets WI vs PAK: वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू जस्टिन ग्रीव्सने कसोटी क्रिकेटमध्ये असा काही कारनामा केला आहे जो आजवरच्या इतिहासात कोणत्याही गोलंदाजाला करता आलेला नाही. पाकिस्तानविरूद्धच्या कसोटीत ग्रीव्सने सलग ५ षटके मेडन टाकली. एवढंच नाही तर त्याने या पाच षटकात ५ विकेट्स देखील घेतल्या. कसोटी क्रिकेटमध्ये अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे.
त्रिनिदाद मध्ये खेळल्या जाणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या कसोटीत तिसऱ्या दिवशी ग्रीव्सने लंचच्या आधी आणि त्यानंतर जबरदस्त स्पेल टाकत पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं. विशेष म्हणजे जस्टिन ग्रीव्ससने कसोटी क्रिकेटच्या त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच पाच विकेट्स घेतल्या आहेत.
यापूर्वी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने २०१६ मध्ये जोहान्सबर्ग कसोटीत दक्षिण अफ्रिकेविरूद्ध सलग ४ षटके मेडन टाकत चार विकेट्स घेतल्या होत्या. ग्रीव्सने ब्रॉडचे रेकॉर्ड तोडले आहे.
सामना झाल्यावर ग्रीव्स म्हणाला की, 'ज्यावेळी मी गोलंदाजीला आलो त्यावेळी कर्णधार रोस्टन चेसने मला फक्त टिच्चून मारा करण्यास सांगितलं होतं. चेंडू सीम करत होता. त्याचा मला फायदा मिळाला.'
ते पुढे म्हणाला की, 'संघ माझ्याकडून नेहमी कठिण काळात जबाबदारी देतो आणि कामगिरी करण्याची अपेक्षा करतो. क्रिकेटमध्ये पहिल्यांदा ५ विकेट्स घेणे अत्यंत खास आहे. मात्र सामन्यात अजून आम्हाला बरंच काही करायचं आहे.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर एक वेळ अशी होती की पाकिस्तानची स्थिती मजबूत होती. त्यांनी ३ बाद २४४ धावा केल्या होत्या. कर्णधार शान मसूद शतक ठोकून क्रीजवर ठाण मांडून बसला होता. मात्र ग्रीव्सने मसूदचा काटा काढला अन् पाकिस्तानचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.
ग्रीव्सने त्यानंतर एकही धाव न देता ओमेर जमाल, अली उस्मान आणि मोहम्मद रिजवानला बाद केलं. लंचपर्यंत पाकिस्तानची अवस्था ८ बाद २६७ धावा अशी झाली. लंचनंतर पहिल्याच षटकात ग्रीव्सने मोहम्मद अब्बासची विकेट घेतली अन् आपली पाचवी शिकार कोणतीही धाव न देता केली. पाकिस्तानचा संपूर्ण संघ २८२ धावात गार झाला. विंडीजने पहिल्या डावात ३११ धावा केल्या होत्या.
मात्र विंडीजला दुसऱ्या डावात फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यांची दुसऱ्या डावात ७ बाद १२६ धावा अशी अवस्था झाली आहे. आता विंडीजकडे एकूण १५५ धावांची आघाडी असून शमार जोसेफ २२ तर केमार रोच ५ धावा करून क्रीजवर टिकून आहेत.