Test Cricket Rules Update | बॅड लाईटमुळे व्यत्यय आल्यास कसोटीत गुलाबी चेंडू वापरता येणार

Test Cricket Rules Update |
Test Cricket Rules Update | बॅड लाईटमुळे व्यत्यय आल्यास कसोटीत गुलाबी चेंडू वापरता येणार
Published on
Updated on

दुबई; वृत्तसंस्था : आयसीसी आता खराब प्रकाशामुळे बाधित होणार्‍या कसोटी सामन्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ‘पिंक बॉल’ (गुलाबी चेंडू) वापरण्याची परवानगी देणार आहे. खराब प्रकाशामुळे खेळ लवकर थांबवला जाणे टाळण्यासाठी आणि दिवसातील पूर्ण षटके खेळवून घेण्यासाठी आयसीसीने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अहमदाबाद येथे झालेल्या आयसीसी बोर्डाच्या वार्षिक बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

हा नियम काही अटींनुसार लागू केला जाणार आहे. यात दोन्ही संघांची पूर्व संमती, सामन्याची सुरुवात लाल चेंडूने असावी, याचा समावेश असणार आहे. यासाठी मालिका सुरू होण्यापूर्वी दोन्ही सहभागी संघांनी या बदलासाठी लेखी संमती देणे बंधनकारक असेल. नैसर्गिक सूर्यप्रकाश कमी झाल्यास पंच फ्लडलाईटस् सुरू करतील आणि दिवसाची उर्वरित षटके पूर्ण करण्यासाठी गुलाबी चेंडू खेळात आणला जाईल, असे यात नमूद आहे. आयसीसीच्या या नवीन नियमांची अधिकृत अंमलबजावणी 1 ऑक्टोबर 2026 पासून होईल.

प्रत्यक्ष सामन्यात हा नियम कसा काम करेल?

समजा, दिवसाच्या 90 षटकांपैकी 75 षटके पूर्ण झाली आहेत आणि त्यानंतर प्रकाश खूपच कमी झाला आहे, अशा वेळी खेळ लवकर थांबवण्याऐवजी उर्वरित 15 षटके फ्लडलाईटस् लावून आणि गुलाबी चेंडू वापरून पूर्ण केली जातील.

आयसीसीचे इतर महत्त्वाचे नियम बदल

आयसीसीने गुलाबी चेंडूच्या प्रयोगाव्यतिरिक्त या बैठकीत इतरही काही मोठे निर्णय घेतले आहेत.

मुख्य प्रशिक्षक मैदानावर येऊ शकणार : सामन्यादरम्यान मिळणार्‍या ‘ड्रिंक्स ब्रेक’मध्ये मुख्य प्रशिक्षक किंवा त्यांचे सहायक खेळाडूंशी चर्चा करण्यासाठी सीमारेषेच्या आत जाऊ शकतील.

अतिरिक्त डीआरएस रिव्ह्यू : स्थानिक आणि नवख्या पंचांना मदत म्हणून आता संघांना प्रत्येक डावात एक जास्तीचा चुकीचा रिव्ह्यू (कसोटीत 3 आणि मर्यादित षटकांच्या सामन्यात 2 वापरण्याची परवानगी असेल.

हॉक-आय ट्रॅकिंग : संशयास्पद गोलंदाजीची अ‍ॅक्शन तपासण्यासाठी आणि त्याचा अहवाल तयार करण्यासाठी मॅच ऑफिशियल आता रिअल-टाईम हॉक-आय डेटाचा वापर करू शकतील.

लेग-साईड वाईड नियम कायम : मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये लेग-साईडला जाणार्‍या चेंडूसाठी वापरला जाणारा कडक वाईडचा नियम आता कायमस्वरूपी लागू करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news