स्पोर्ट्स

India Win Bronze Medal : 2 गोलची पिछाडी भरून काढत भारतीय संघाची कांस्य पदकावर मोहोर, अर्जेंटिनावर 4-2 फरकाने विजय

Junior Hockey World Cup : भारतासाठी 2016 नंतरचे पहिलेच पदक

रणजित गायकवाड

Junior Hockey World Cup India Win Bronze Medal Beat Argentina by 4-2

चेन्नई : एफआयएच पुरुष ज्युनिअर हॉकी विश्वचषकात भारताने संघर्ष व दुर्दम्य जिद्दीची प्रचिती देत अर्जेंटिनाला 4-2 अशा फरकाने नमवत कांस्यपदकावर आपली मोहोर उमटवली. एकवेळ भारताचा संघ या लढतीत दोन गोलनी पिछाडीवर होता. मात्र, त्यानंतर त्यांनी मारलेली मुसंडी विशेष लक्षवेधी ठरली. तिसऱ्या सत्रातील भारताचा खेळ निर्णायक ठरला.

या लढतीत सामन्याच्या सुरुवातीपासून अर्जेंटिनाने बॉल पझेशनच्या निकषावर उत्तम वर्चस्व गाजवले होते. अर्जेंटिनाच्या निकोलस रॉड्रीगेझने तिसऱ्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर गोल करत भारताला धक्का दिला. 20 व्या मिनिटाला दिलराज सिंगचा जोरदार प्रहार अर्जेंटिनाच्या गोलरक्षक जोआक्विन रूईझने शानदाररीत्या अडवला. यामुळे बरोबरीची संधी हुकली.

मध्यंतरानंतर भारतीयांनी आक्रमक खेळावर भर दिला. मात्र, 30 मिनिटांच्या खेळानंतर लागोपाठ 4 पेनल्टी कॉर्नर मिळूनही भारताला त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. दुसरीकडे अर्जेंटिनाने 37 व्या, 40 व्या आणि 41 व्या मिनिटाला मिळालेल्या कॉर्नरवर जोरदार आक्रमणे केली. मात्र, भारतीय गोलरक्षक प्रिन्सदीप सिंगचा बचाव त्यांना भेदता आला नाही.

शेवटच्या सत्रात चित्र बदलले

पुढे, 44 व्या मिनिटाला सँटियागो फर्नांडेझने अर्जेंटिनासाठी दुसरा गोल केला आणि भारतासमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली. दुसऱ्या सत्राअखेर भारतीय संघ 0-2 अशा फरकाने पिछाडीवर होता. मात्र, शेवटच्या सत्रात 49 व्या मिनिटाला अनमोल एक्काच्या शक्तिशाली फ्लिकवर अंकित पालने अप्रतिम डिफ्लेक्टवर पहिला गोल केला. केवळ चार मिनिटांत मनमीत सिंगनेही एक्काच्या फ्लिकवर गोल करून सामना 2-2 असा बरोबरीत आणला.

खेळावर पकड घेत भारताने सतत आक्रमण करत 57 व्या मिनिटाला शारदानंद तिवारीने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करीत आघाडी घेतली. त्यानंतर, 58 व्या मिनिटाला सजवलेल्या पेनल्टी कॉर्नरची उत्कृष्ट अंमलबजावणी करत अनमोल एक्काने चौथा गोल नोंदवला आणि इथेच भारताच्या झुंजार विजयावर शिक्कामोर्तब झाले. या स्पर्धेत भारताने पदक जिंकण्याची ही 2016 नंतरची पहिलीच वेळ ठरली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT