Palestinian Flag on Cricket Helmet Pudhari
स्पोर्ट्स

Palestinian Flag: हेल्मेटवर पॅलेस्टाईनचा झेंडा? जम्मू-काश्मीरमधील क्रिकेटपटूची पोलिसांकडून चौकशी, व्हिडीओ व्हायरल

Palestinian Flag on Cricket Helmet: जम्मू-काश्मीरमधील एका खासगी क्रिकेट स्पर्धेत खेळताना फुरकान भट या खेळाडूने पॅलेस्टाईनचा झेंडा असलेले हेल्मेट वापरल्याचा आरोप आहे.

Rahul Shelke

Palestinian Flag on Cricket Helmet: जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या एका क्रिकेट स्पर्धेतील घटनेमुळे वाद निर्माण झाला आहे. एका स्थानिक क्रिकेटपटूने हेल्मेटवर पॅलेस्टाईनचा झेंडा असल्यासारखे चिन्हे लावल्याचा आरोप झाल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे.

जम्मू जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या जम्मू-काश्मीर चॅम्पियन्स लीग या खासगी स्पर्धेत फुरकान भट नावाचा क्रिकेटपटू खेळत होता. सामन्यादरम्यान त्याने घातलेल्या हेल्मेटवर पॅलेस्टाईनचा झेंडा असल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओतून करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणावरून चर्चा सुरू झाली.

या घटनेनंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी फुरकान भट यांना चौकशीसाठी बोलावले. तसेच या स्पर्धेचे आयोजक साजिद भट यांनाही डोमाना पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले. मात्र गुरुवारी संध्याकाळपर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता, अशी माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही लोकांनी फुरकान भट यांच्यावर कारवाईची मागणी केली. एका खेळाडूने सांगितले की, या घटनेमुळे खेळाडूंमध्येही नाराजी व्यक्त केली जात आहे.

जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनने या स्पर्धेशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. ही स्पर्धा खासगी पातळीवर आयोजित करण्यात आली होती आणि त्यात स्थानिक खेळाडू सहभागी होते, असे असोसिएशनने सांगितले. असोसिएशनचे प्रभारी अधिकारी ब्रिगेडियर अनिल गुप्ता यांनी सांगितले की, हे प्रकरण त्यांच्या अधिकारक्षेत्रात येत नाही आणि पोलिस त्यावर योग्य ती कारवाई करतील.

दरम्यान, भाजपनेही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे आमदार आर. एस. पाठानिया यांनी याला खेळाच्या मैदानाचा गैरवापर करून राजकीय अजेंडा पुढे नेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला.

भारताची भूमिका स्पष्ट असून, भारत पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यातील शांततेसाठी प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर ही घटना अधिक संवेदनशील असून, पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT