प्रातिनिधिक छायाचित्र.  Pudhari
स्पोर्ट्स

Jasprit Bumrah IPL 2026 | पाच सामन्यांनंतरही जसप्रीत बुमराहची विकेटची पाटी कोरीच! माजी क्रिकेटपटू आर. अश्विनने सांगितले कारण

Jasprit Bumrah IPL performance | बुमराहच्या IPL कारकिर्दीतील बळीविना गेलेली सर्वात मोठी मालिका

पुढारी वृत्तसेवा

आयपीएलच्या मागील हंगामातील एक सामना व यंदाच्या हंगामात चार सामन्यांत बुमराहने बळी न घेता सलग १२२ चेंडू टाकले आहेत.

Jasprit Bumrah IPL performance

मुंबई : टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने गेल्या ५ IPL सामन्यांपासून एकही बळी (विकेट) मिळवलेला नाही. यामध्ये IPL २०२५ चा शेवटचा सामना आणि IPL २०२६ मधील सुरुवातीच्या ४ सामन्यांचा समावेश आहे. त्याच्या चाहत्यांबरोबरच क्रिकेटप्रेमींसाठी हे ऐकायला अविश्वसनीय वाटत असले तरी हेच वास्तव आहे. यामागे काय कारण असावे, यावरही खळबळ सुरू असतानाच यावर भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आपलं मत व्यक्त केले आहे.

जसप्रीत १२२ चेंडू, एकही बळी नाही!

'क्रिकविझ'च्या रिपोर्टनुसार, आयपीएलच्या मागील हंगामातील एक सामना व यंदाच्या हंगामात चार सामन्यांत बुमराहने बळी न घेता सलग १२२ चेंडू टाकले आहेत. त्याच्या IPL कारकिर्दीतील बळीविना गेलेली ही सर्वात मोठी मालिका आहे.

जसप्रीत बुमराहच्या पाच IPL डावांमधील कामगिरी

०/४० (४) विरुद्ध PBKS, अहमदाबाद

०/३५ (४) विरुद्ध KKR, वानखेडे

०/२१ (४) विरुद्ध DC, दिल्ली

०/३२ (३) विरुद्ध RR, गुवाहाटी

रविवारी वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध झालेल्या मुंबई इंडियन्सच्या सामन्यातही बुमराहला पुन्हा एकदा एकही बळी मिळवता आला नाही; चार षटकांत त्याने ०/३५ अशी कामगिरी नोंदवली. असे असले तरी, RCB ने २० षटकांत २४०/४ अशी प्रचंड धावसंख्या उभारली असतानाही, मुंबई इंडियन्सचा कमी धावा देणारा तो सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला.

बुमराहचे खरे महत्त्व हे अचूक यॉर्कर्स टाकण्यात : आर. अश्विन

आर. अश्विनने आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "आयपीएलमध्ये बुमराहला केवळ विकेट्स मिळत नाहीत यावर लक्ष केंद्रित करणे हे दिशाभूल करणारे आहे. यामुळे मुंबई इंडियन्स संघाचेच नुकसान होऊ शकते. बुमराहचे खरे महत्त्व हे अचूक यॉर्कर्स टाकण्यात आणि प्रतिस्पर्ध्यांच्या धावा रोखण्यात आहे; विशेषतः वानखेडेसारख्या मैदानांवर."

विकेट घेण्याची क्षमता तुमच्या सहकाऱ्यांवर अवलंबून

"बुमराहला बळी मिळत नसल्याची चर्चा संघाच्या कामगिरीत अडथळा निर्माण करू शकते. बळी मिळवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, त्याने अचूक यॉर्कर्स टाकणे आणि प्रतिस्पर्ध्यांना प्रत्येक धावेसाठी झुंजवत धावा रोखून धरणे हे अधिक महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्हाला सलग षटके टाकणे शक्य नसते, तेव्हा तुमची बळी घेण्याची क्षमता ही तुमच्या सहकाऱ्यांवर अवलंबून असते."

टीकेपेक्षा रणनीतीवर लक्ष देण्याची गरज

बुमराहला विकेट्स मिळत नाहीत या चर्चेमुळे संघावर उगाच दडपण येऊ शकते. खरं तर, वानखेडेसारख्या खेळपट्टीवर विकेट्स घेण्याच्या घाईपेक्षा अचूक यॉर्कर्स टाकून धावा रोखणे जास्त महत्त्वाचे आहे. जरी गेल्या पाच आयपीएल सामन्यांत त्याला एकही विकेट मिळाली नसली, तरी त्याची कामगिरी वाईट नाही. केवळ दोनच सामन्यांत (पंजाब आणि राजस्थान विरुद्ध) त्याने जास्त धावा दिल्या आहेत; एरवी त्याने फलंदाजांना धावांसाठी चांगलेच झुंजवले आहे, असेही अश्विनने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT