Pudhari Photo.
स्पोर्ट्स

Jasprit Bumrah |"तो मेस्सी किंवा रोनाल्डोसारखा..." : इंग्लंडचा माजी कर्णधार जसप्रीत बुमराहबद्दल नेमकं काय म्‍हणाला?

Jasprit Bumrah | 'बुमराह कोणत्याही संघात असता तरी त्‍या संघाने विश्वचषक जिंकला असता'

पुढारी वृत्तसेवा

Vaughan on Jasprit Bumrah

अहमदाबाद : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध जसप्रीत बुमराहने केलेल्या ऐतिहासिक कामगिरीवर क्रिकेट जगत थक्क झाले आहे. आता इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने बुमराहचे तोंडभरून कौतुक केले असून त्याची तुलना थेट लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो या फुटबॉलमधील महानायकांशी केली आहे.

बुमराहची ऐतिहासिक कामगिरी

गेल्या रविवारी अहमदाबादमध्ये झालेल्या जेतेपदाच्या लढतीत बुमराहने १५ धावांत ४ बळी घेत न्यूझीलंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. विश्वचषकाच्या बाद फेरीच्या (नॉकआउट) सामन्यात चार बळी घेणारा तो इतिहासातील पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. यासह टी-२० विश्वचषकातील त्याच्या एकूण बळींची संख्या ४० वर पोहोचली असून, ५.६६ च्या उत्कृष्ट इकॉनॉमी रेटसह सर्वाधिक बळी घेणारा तो जगातला नंबर १ वेगवान गोलंदाज बनला आहे.

बुमराहा संघात स्‍थान द्या , इंग्लंड विश्वचषक जिंकेल

'स्टिक टू क्रिकेट' पॉडकास्टवरील चर्चेदरम्यान मायकल वॉन म्हणाला की, "बुमराह हा मी आतापर्यंत पाहिलेला सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. त्याला इंग्लंडच्या संघात स्थान द्या आणि बघा, इंग्लंड विश्वचषक जिंकेल." यावर माजी क्रिकेटपटू मार्क बुचरनेही सहमती दर्शवत म्हटले की, "तो कोणत्याही संघात असता तरी त्या संघाने विश्वचषक जिंकला असता. बुमराहचा प्रभाव मेस्सी किंवा रोनाल्डोसारखा आहे, जे स्वबळावर सामन्याचा निकाल बदलण्याची क्षमता ठेवतात.

कूकने उपस्‍थित केले बुमराहच्‍या कसोटीतील कामगिरीवर प्रश्‍नचिन्‍ह

या संवादात माजी कर्णधार अ‍ॅलिस्टर कूकने थोडी वेगळी भूमिका मांडली. बुमराह हा सध्याच्या घडीला सर्व फॉरमॅटमधील सर्वोत्तम गोलंदाज असल्याचे मान्य करूनही, कूकने त्याच्या कसोटीतील 'मॅच विनिंग' स्पेलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "बुमराहने कसोटीत ८/१५ असा एखादा अविस्मरणीय स्पेल टाकला आहे का?" असा प्रश्न कूकने विचारला. "मी त्याला ऑस्ट्रेलियातील सपाट खेळपट्ट्यांवर घातक गोलंदाजी करताना पाहिले आहे," असे वॉनने स्‍पष्‍ट केले.

आकडेवारी काय सांगते?

आकडेवारीनुसार, बुमराहने कसोटी क्रिकेटमध्येही आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्याने आतापर्यंत ८ वेळा कसोटी सामन्यात ८ किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेण्याची किमया साधली आहे. विशेष म्हणजे, यातील सहा कामगिरी इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या परदेशी दौऱ्यांतही त्‍याने चमकदार कामगिरी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT