

India vs South Africa 1st Test Jasprit Bumrah five wicket haul new records
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा शानदार शुभारंभ झाला आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजांचा घातक मारा पाहायला मिळाला. तिसऱ्या सत्रातच द. आफ्रिकेचा संघ अवघ्या १५९ धावांमध्ये गारद झाला. या दरम्यान, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने एका डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. याचसोबत त्याने भारताचा माजी फिरकीपटू आर. अश्विन आणि पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम यांना एकाचवेळी मागे टाकले.
दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांची सुरुवात वेगवान झाली. सलामी जोडीने अर्धशतकी भागिदारी केली. पण त्यानंतर बुमराहने रियान रिकेल्टन आणि एडन मार्करम यांना बाद करून आफ्रिकेला सुरुवातीचे दोन मोठे धक्के दिले. त्याने सलामीवीर रियान रिकेल्टन (२३ धावा) याला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर एडन मार्करम (३१ धावा) याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या सुरुवातीच्या धक्क्यानंतरही बुमराह शांत बसला नाही. त्याने आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये टोनी डी झोरझी, सायमन हार्मर आणि केशव महाराज यांना आपले शिकार बनवत दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावाचा अंत केला.
दरम्यान, बुमराहने रिकेल्टनला क्लीन बोल्ड करताच एक खास विक्रम आपल्या नावावर केला. रिकेल्टनचा बळी हा बुमराहचा कसोटी क्रिकेटमधील १५२ वा 'क्लीन बोल्ड' बळी ठरला. त्यानंतर सायमन हार्मरला क्लिन बोल्ड करून त्याचा आकडा १५३ पर्यंत पोहचला आहे. या कामगिरीसह, कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक क्लीन बोल्ड करणारा बुमराह तिसरा गोलंदाज बनला आहे. त्याने माजी दिग्गज फिरकीपटू आर. अश्विनला या यादीत मागे टाकले आहे. अश्विनने १५१ वेळा क्लीन बोल्ड करून बळी घेतले आहेत. आता बुमराहच्या पुढे फक्त अनिल कुंबळे आणि कपिल देव हे आहेत. त्यांचेही रेकॉर्ड बुमराहच्या निशाण्यावर असेल.
अनिल कुंबळे - १८६
कपिल देव - १६७
जसप्रीत बुमराह - १५३*
आर. अश्विन - १५१
रवींद्र जडेजा - १४५*
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 'बोल्ड' करण्याचा जागतिक विक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरन यांच्या नावावर आहे. त्यांनी ४९५ सामन्यांमध्ये २९० फलंदाजांना बोल्ड केले आहे.
बुमराह आता SENA (द. आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) संघांविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ५ बळी घेणारा आशियाई वेगवान गोलंदाज ठरला आहे. पाकिस्तानच्या वसीम अक्रमने SENA देशांविरुद्ध १२ वेळा ५ बळी घेण्याचा विक्रम केला होता, मात्र बुमराहने हा पराक्रम आता १३ वेळा करत नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे, बुमराहने केवळ ८० डावांमध्ये ही खास कामगिरी नोंदवली आहे.
जसप्रीत बुमराह : ८० डाव : १३* वेळा
वसीम अक्रम : ७५ डाव : १२ वेळा
कपिल देव : १११ डाव : ११ वेळा
वकार युनूस : ७४ डाव : ९ वेळा
इम्रान खान : ६१ डाव : ८ वेळा
झहीर खान : १०२ डाव : ८ वेळा
शोएब अख्तर : ३६ डाव : ८ वेळा
२०१८ पासून आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये सलामी फलंदाजांना सर्वाधिक वेळा बाद करण्याचा विक्रम इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड याच्या नावावर होता. या काळात त्याने १२ वेळा ही कामगिरी केली होती. मात्र, बुमराहने द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच डावात आपल्या सुरुवातीच्या स्पेलमध्ये दोन्ही सलामीवीरांना बाद करून हा विक्रम मोडला. आता बुमराह गेल्या ७ वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये १३ वेळा सलामी फलंदाजांना बाद करणारा क्रमांक-१ गोलंदाज बनला आहे.
द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यातील बुमराहचा पहिला स्पेल पूर्णपणे 'उत्कृष्ट' होता. त्याने एकूण ७ षटके गोलंदाजी केली. यापैकी ४ षटके निर्धाव राहिली. यादरम्यान, त्याने केवळ ९ धावा खर्च करत २ महत्त्वाचे बळी घेतले. सर्वप्रथम त्याने रिकल्टनला इन-स्विंग चेंडूवर क्लिन बोल्ड केले. या चेंडूची गती ताशी १४० किमीपेक्षा जास्त होती, जो थेट फलंदाजाचे स्टंप उडवत गेला. त्यानंतर एडन मार्करामला यष्टीमागे ऋषभ पंतकडे झेल देण्यास भाग पाडून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर पंतने पकडलेला हा पहिलाच उत्कृष्ट झेल ठरला, ज्याने बुमराहच्या प्रभावी गोलंदाजीचा पूर्ण फायदा घेतला.