स्पोर्ट्स

IND vs ENG 4th Test : चौथ्या कसोटीत बुमराहच्या खेळण्यावरून संभ्रम! प्रशिक्षक म्हणाले; ‘बघू.. आम्हाला विचार करावा लागेल’

Jasprit Bumrah : मालिका सुरू होण्यापूर्वीच बुमराह मालिकेत जास्तीत जास्त तीन कसोटी सामने खेळू शकेल, असे संकेत देण्यात आले होते. त्यामुळे...

रणजित गायकवाड

jasprit bumrah availability uncertain for 4th test

भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील चौथा कसोटी सामना 23 ते 27 जुलै दरम्यान मँचेस्टर येथे खेळला जाणार आहे. भारतीय संघ सध्या कसोटी मालिकेत 1-2 ने पिछाडीवर असून, मालिका बरोबरीत आणण्यासाठी संघ उत्सुक आहे. अशा परिस्थितीत, चौथ्या कसोटी सामन्यात भारताला जसप्रीत बुमराहच्या उपस्थितीची नितांत गरज भासणार आहे.

मालिका सुरू होण्यापूर्वीच बुमराह मालिकेत जास्तीत जास्त तीन कसोटी सामने खेळू शकेल, असे संकेत देण्यात आले होते. त्यामुळे, आगामी कसोटीत बुमराह खेळणार की नाही, हाच सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, मॅन्चेस्टर कसोटीत बुमराह खेळणार की नाही याबाबत भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोएशेट यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. गुरुवारी सराव सत्रानंतर डोएशेट यांनी, बुमराह चौथ्या कसोटीत खेळण्याची शक्यता असल्याचे भाष्य केले आहे.

बुमराह इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटीतून त्याला विश्रांती देण्यात आली होती. यानंतर तो लॉर्ड्स मैदानावरील तिसऱ्या कसोटी सामन्यात सहभागी झाला.

‘मँचेस्टरमध्येच निर्णय घेतला जाईल’

डोएशेट यांनी बेकेनहॅम येथील संघाच्या एकमेव सराव सत्रानंतर यावर अधिक माहिती दिली. ते म्हणाले, ‘बुमराह चौथ्या कसोटीत खेळण्याबाबतचा निर्णय मँचेस्टरमध्येच घेऊ. पुढील दोन कसोटी सामन्यांपैकी एका सामन्यासाठी आम्ही त्याची निवड करू शकतो. मँचेस्टरमध्ये मालिका पणाला लागली आहे, त्यामुळे त्याला खेळवण्याचा विचार निश्चितपणे केला जाईल. तरीही, आम्हाला सर्व बाबींचा विचार करावा लागेल. आम्ही तिथे किती दिवस क्रिकेट खेळू शकू? हा सामना जिंकण्यासाठी आमच्यासाठी सर्वोत्तम संधी कोणती आहे? आणि त्यानंतर ओव्हल कसोटीसाठीची योजना यात कशी जुळून येते? हेदेखील पाहावे लागेल,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

डोएशेट पुढे म्हणाले, ‘ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर आम्ही आमच्या गोलंदाजांची तुलना इतर संघांच्या गोलंदाजांशी करण्यासाठी आलेलो नाही. आमची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत. बुमराह त्याच्या स्पेलमध्ये, विशेषतः लहान स्पेलमध्ये काय किमया करू शकतो, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. काही गोलंदाज असेच असतात आणि प्रत्येकजण सारखाच असेल असे नाही.’

ऋषभ पंत सराव सत्रात अनुपस्थित

बोटाच्या दुखापतीतून सावरत असलेला यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत गुरुवारी सराव सत्रात सहभागी झाला नाही, मात्र तो संघासोबत बेकेनहॅमला गेला आहे. मँचेस्टर कसोटीसाठी तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यावर डोएशेट म्हणाले, ‘तिसऱ्या कसोटीत त्याने प्रचंड वेदना सहन करत फलंदाजी केली होती आणि डावाच्या मध्यातच यष्टीरक्षक बदलावा लागण्याची नामुष्की पुन्हा ओढवून घेण्याची आमची इच्छा नाही. त्याने आज विश्रांती घेतली. आम्ही त्याला पुरेशी विश्रांती देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आशा आहे की मँचेस्टरमधील पहिल्या सराव सत्रात तो खेळण्यासाठी पूर्णपणे सज्ज असेल.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT