जम्मू-काश्मीरच्या संघाने प्रथमच रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. 
स्पोर्ट्स

Ranji Trophy 2026 |अशक्य ते शक्य करून दाखवलं! जम्मू-काश्मीरने रचला इतिहास; रणजी ट्रॉफीच्‍या फायनलमध्ये धडक

Ranji Trophy 2026 | उपांत्य फेरीत पश्चिम बंगालविरोधात दिमाखदार विजय

पुढारी वृत्तसेवा

विजयाचा पाठलाग करताना चौथ्या दिवसाच्या खेळपट्टीवर जम्मू-काश्मीरची सुरुवात डळमळीत झाली होती. आकाश दीपच्या गोलंदाजीवर त्यांची अवस्था १२ धावांवर २ बाद अशी झाली होती. मात्र, मधल्या फळीने संयमी खेळी करत ऐतिहासिक कामगिरी केली.

Jammu Kashmir entering Ranji Trophy final

कोलकाता : भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये बुधवारी एका नव्या इतिहासाची नोंद झाली. ‘डार्क हॉर्स’ मानल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या संघाने रणजी ट्रॉफीत आपला स्वप्नवत प्रवास सुरू ठेवला आहे. उपांत्य सामन्यात बलाढ्य पश्चिम बंगाल संघाचा पराभव करत या संघाने प्रथमच रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

नाणेफेक जिंकत जम्मू-काश्मीरचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय

उपांत्य सामन्यात नाणेफेक जिंकून जम्मू-काश्मीरने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. बंगालने सुदीप कुमार घरामीच्या १४६ धावांच्या खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ३२८ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात जम्मू-काश्मीरचा पहिला डाव ३०२ धावांवर आटोपला. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत ९० धावांत ८ बळी घेतले. जम्मू-काश्मीर २६ धावांनी पिछाडीवर होता.

बंगालचा दुसरा डाव कोसळला

दुसऱ्या डावात सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटले. जम्मू-काश्मीरच्या वेगवान गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत बंगालच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. बंगालचा दुसरा डाव अवघ्या ९९ धावांत आटोपला. आकिब नबी (४/३६) आणि सुनील कुमार (४/२७) या जोडीने बंगालला स्वस्तात गुंडाळल्यामुळे जम्मू-काश्मीरसमोर विजयासाठी १२६ धावांचे सोपे लक्ष्य होते.

मधल्या फळीतील संयमपूर्ण फलंदाजी अन् ऐतिहासिक विजय

विजयाचा पाठलाग करताना चौथ्या दिवसाच्या खेळपट्टीवर जम्मू-काश्मीरची सुरुवात डळमळीत झाली होती. आकाश दीपच्या गोलंदाजीवर त्यांची अवस्था १२ धावांवर २ बाद अशी झाली होती. मात्र, मधल्या फळीने संयम राखला. वंशज शर्माने नाबाद ४३ धावांची चिवट खेळी केली, तर शुभम पुंडीर (२७) आणि कर्णधार पारस डोगरा यांनी मोलाची साथ दिली. जम्मू-काश्मीरने हा सामना 7 गडी राखून जिंकला.

वेगवान त्रिकुटाचा भेदक मारा

जम्मू-काश्मीरचा यंदाचा हंगाम जबरदस्त राहिला आहे. या संघाने साखळी फेरीत कर्नाटक आणि मुंबईसारख्या दिग्गज संघांना पराभूत केल्यामुळे संघाचा आत्मविश्वास उंचावला होता. आकिब नबी, सुनील कुमार आणि युद्धवीर सिंग चरक या वेगवान गोलंदाजांच्या त्रिकुटाने संपूर्ण हंगामात आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

फायनलकडे वेधले सर्वांचे लक्ष

जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटमधील पायाभूत सुविधांचा अभाव आहे. अनेक आव्हानांना सामोरे जात खेळाडूंनी आपली क्षमता सिद्ध करत प्रथमच रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. ही खरोखरच जम्मू-काश्मीर क्रिकेटसाठी अभिमानास्पद कामगिरी ठरली आहे. आता उत्तराखंड आणि कर्नाटक मधील उपांत्य सामन्यातील विजेता संघाशी जम्मू-काश्मीर संघाचा सामना होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT