Iran Football Team Note  x
स्पोर्ट्स

Iran Football Team Note : "स्वाभिमानाने परतत आहोत.." ; इराण फुटबॉल संघाने लॉस एंजेलिसच्या ड्रेसिंग रूममध्ये ठेवले भावनिक पत्र!

FIFA world cup Iran Football Team Note : कठीण परिस्थितीतही संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या चाहत्‍यांचे मानले आभार

पुढारी वृत्तसेवा

FIFA world cup Iran Football Team Note : २८ फेब्रुवारी २०२६... अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला आणि संपूर्ण जग अनिश्चिततेच्या गर्तेत ढकलले गेले! मात्र, विश्वचषक सुरू असतानाच अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार झाला आणि जगाने मोकळा श्वास घेतला. आता फिफा वर्ल्ड कप (FIFA World Cup) स्पर्धेत रविवारी (दि. २१) एक भावूक प्रसंग पाहायला मिळाला. इराणच्या पुरूष फुटबॉल संघाने सोफी स्टेडियममधील आपल्या ड्रेसिंग रूम) एक हस्तलिखित पत्र सोडले आहे. या पत्राद्वारे त्यांनी लॉस एंजेलिसने केलेल्या आदरातिथ्याबद्दल आभार मानले असून, कठीण परिस्थितीतही संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या चाहत्‍यांचे आभार मानले आहेत.

"आम्ही ताठ मानेने आणि स्वाभिमानाने इथून परतत आहोत"

रविवारी बेल्जियमविरुद्धचा सामना ०-० असा बरोबरीत सुटल्यानंतर इराणचे वर्ल्ड कपमधील आव्हान अजूनही जिवंत आहे. या अत्यंत चुरशीच्या सामन्यातनंतर "आम्ही ताठ मानेने आणि स्वाभिमानाने इथून परतत आहोत," असे इराणच्या खेळाडूंनी या पत्रात म्हटले आहे.ग्रुप 'जी' (Group G) मधील त्यांचा शेवटचा सामना सिएटल येथे इजिप्तविरुद्ध होणार असून, इराणचा संघ बाद फेरीत (Knockout Stage) पोहोचण्याच्या शर्यतीत कायम आहे.

"शांतता आणि मैत्रीचे साम्राज्य नांदो..."

या पत्रात लिहिले आहे की, "हजारो वर्षांपूर्वीच्या प्राचीन पर्शियापासून (इराण) ते आजच्या आधुनिक इराणपर्यंत, इराणचा आत्मा आजही जिवंत आणि खंबीर आहे. लॉस एंजेलिस, तुमच्या आदरातिथ्याबद्दल मनापासून आभार. आम्ही येथे अभिमानाने आलो, सन्मानाने लढलो आणि आता स्वाभिमानाने परतत आहोत."

चाहत्‍यांचे मानले आभार

या पत्रात सोफी स्टेडियममधील दोन सामन्यांदरम्यान पाठिंबा देणाऱ्या इराणी चाहत्यांचेही आभार मानण्यात आले आहेत. रविवारी झालेल्‍या १८० मिनिटांच्या खेळात इराणी नागरिकाने आपले हृदय, आवाज आणि आत्मा इराणसाठी पणाला लावला, त्या प्रत्येकाचे मनापासून आभार. सर्व राष्ट्रांमध्ये शांतता, आदर आणि मैत्रीचे साम्राज्य नांदो."

पत्राच्या शेवटी #168

या पत्राच्या शेवटी #168 आणि #Minab हे हॅशटॅग वापरण्यात आले आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील सुरू असलेल्या संघर्षादरम्यान, इराणच्या 'मिनाब' शहरातील एका शाळेवर झालेल्या बॉम्बहल्ल्याचा हा संदर्भ आहे. या हल्ल्यातील मृतांच्या आकड्याबाबत वेगवेगळ्या अहवालांमध्ये तफावत असली, तरी युद्धातील अत्यंत भीषण घटना मानली जाते.

घरच्या मैदानासारखे वातावरण

लॉस एंजेलिसमध्ये मिळालेल्या प्रचंड पाठिंब्यामुळे इराणला हे आपले घरचेच मैदान असल्यासारखे होते. इराणच्या बाहेर सर्वात मोठी इराणी समुदाय राहणाऱ्या शहरांमध्ये लॉस एंजेलिस शहराचा समावेश होतो, त्यामुळे दोन्ही सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. काही चाहत्यांच्या हातात 'इस्लामिक रिपब्लिक'चा अधिकृत ध्वज होता, तर काही जण १९७९ च्या क्रांतीपूर्वीचा 'सिंह आणि सूर्य' चिन्ह असलेला ध्वज फडकवत होते. हा ध्‍वज इराणी विरोधकांचे प्रतीक मानला जातो.

इराणच्या प्रवासावरील कठीण निर्बंध

या स्पर्धेत इराणच्या प्रवासाच्या नियोजनानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अमेरिकेच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी घातलेल्या निर्बंधांमुळे इराणच्या संघाला अमेरिकेत एका वेळी ४८ तासांपेक्षा जास्त राहण्याची परवानगी नव्हती. परिणामी, इराणला आपला मुख्य तळ तिहुआना (मेक्सिको) येथे हलवावा लागला आणि सामन्यांसाठी ते सीमेपलीकडून प्रवास करत होते. इराणच्या शिष्टमंडळातील अनेकांना अमेरिकेत प्रवेश करताना अडचणींचा सामना करावा लागला. काही अधिकारी आणि साहाय्यक कर्मचाऱ्यांना व्हिसा नाकारण्यात आला, तर विंगर मेहदी तोराबी याला न्यूझीलंडच्या सामन्यानंतर त्याचा 'सिंगल-एंट्री' व्हिसा संपल्यामुळे तिहुआनामधील अमेरिकन दूतावासातून नवीन व्हिसा घ्यावा लागला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT