IPL Trade Hardik Arshdeep: भारतीय संघ सध्या न्यूझीलंडमध्ये वनडे मालिका खेळत आहे. मात्र भारतात आयपीएल ट्रेडचे वारे जोर धरू लागले आहेत. यंदाच्या हंगामापूर्वी हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांच्या आयपीएल ट्रेडची जोरदार चर्चा सुरू आहे. खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जचे हे संभाव्य ट्रेड जवळपास निश्चित झाले असून आता फक्त औपचारिक घोषणा करणं बाकी आहे.
मात्र बहुचर्चित ट्रेडनंतर आता वेगळ्याच चर्चेला तोंड फुटलं आहे. अर्शदीप सिंग हा पंजाब किंग्जचा अव्वल गोलंदाज आहे. तो मोक्याच्या क्षणी सामन्याचं चित्र पालटण्याची ताकद ठेवतो. त्याने पंजाब किंग्जला अनेक सामने जिंकून दिले आहेत. मात्र आता संघ हार्दिक पांड्यासाठी त्याला सोडण्याच्या तयारीत आहे. पंजाबला हा निर्णय महागात पडण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.
हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांची अदलाबदली करण्यावर भारताचा माजी खेळाडू अभिनव मुकुंदने पंजाब किंग्जवर टीका केली आहे. त्याच्या मते या ट्रेडमुळे मुंबई इंडियन्सचाच जास्त फायदा होत असल्याचं दिसत आहे. आकाश चोप्राने देखील अर्शदीपच्या जाण्याने पंजाब किंग्जची गोलंदाजी कमकूवत होण्याची शक्यता वर्तवली.
गेल्या तीन हंगामापासून हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत होता. आता तो पंजाब किंग्जकडून खेळण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना अभिनव मुकुंद म्हणाला, 'पंजाब किंग्जने गेल्या मेगा ऑक्शनमध्ये आपल्या तीन मोठ्या खेळाडूंना रिटेन केलं होतं. यात अर्शदीप सिंग, श्रेयस अय्यर आणि युझवेंद्र चहल यांच्यावर मोठा पैसा खर्च केला होता. आता फ्रेंचायजी आपल्या कोअर ग्रुपमध्ये बदल करू इच्छिते. आता तुम्हाला तुमच्या कोअर ग्रुपवरच विश्वास राहिलेला नाही. तुम्ही आता चांगली कोअऱ टीम बनवू इच्छिता. या निर्णयामुळे अष्टपैलू खेळाडूचा प्रश्न समोर येतो.'
मुकुंद पुढे म्हणाला, मुंबई इंडिन्ससाठी हा जबरदस्त ट्रेड आहे. मात्र पंजाब किंग्जसाठी अनेक प्रश्न निर्माण करणार आहे. मुकुंदने विचारले की हार्दिक पांड्या संघात आला तर तो फक्त अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळणार का? हार्दिक मुंबईचा कर्णधार राहिला आहे. पंजाबमध्ये त्याची भूमिका वेगळी असेल. टीमचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे असणार आहे. हार्दिक आणि श्रेयस यांच्यातील समतोलाचा देखील मुद्दा निर्माण होऊ शकतो.
मुकुंद म्हणाला की, हार्दिकला श्रेयसच्या नेतृत्वाखाली खेळावं लागणार आहे. हार्दिक या भूमिकेसाठी तयार आहे का? याबाबत श्रेयस आणि हार्दिकमध्ये चर्चा झाली आहे का? या अशा गोष्टी आहेत ज्या फ्रेंचायजीमध्ये निश्चित होतात. बाहेर बसून याबाबत काही म्हणणं अवघड आहे.
हार्दिक पांड्या पंजाब किंग्जमध्ये आला तर दुसरा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिससाठी हे अवघड ठरू शकतं. मुकुंदच्या मते हार्दिक संघात असेल तर पंजाब किंग्जला स्टॉयनिसला रिलीज करावं लागण्याची शक्यता आहे. हार्दिक संघात आल्यामुळं संपूर्ण टीमचं स्ट्रक्चरच बदललं जाऊ शकतं. हार्दिकच्या एन्ट्रीने फक्त गोलंदाजी नाही तर अष्टपैलू विभागात सर्व समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.