IPL Ticket Scam: IPL 2026 चा थरार शिगेला पोहोचला असताना क्रिकेट चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. फ्री IPL तिकीट, स्वस्त पास आणि मोफत लाईव्ह मॅच पाहण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात ऑनलाइन फसवणूक सुरू असल्याचे उघड झाले आहे. सायबर गुन्हेगारांनी IPL चाहत्यांना लक्ष्य करत फेक वेबसाइट्स आणि मालवेअर लिंक्सचे मोठे जाळे तयार केले आहे. एका चुकीच्या क्लिकमुळे तुमचे बँक खाते, वैयक्तिक माहिती आणि मोबाईलचा डेटा धोक्यात येऊ शकतो.
सायबर सुरक्षा कंपनी CloudSEK च्या ताज्या अहवालानुसार, IPL 2026 दरम्यान ६०० हून अधिक बनावट तिकीट वेबसाइट्स आणि ४०० पेक्षा जास्त मालवेअर लिंक चालू आहेत. या लिंकद्वारे चाहत्यांना स्वस्त तिकीट किंवा मोफत मॅच स्ट्रीमिंगचे आमिष दाखवले जात आहे.
भारतामध्ये IPL ही क्रिकेट स्पर्धा नसून तो एक मोठा उत्सव बनला आहे. तिकीट मिळवण्यासाठीची धावपळ, टीम जर्सी खरेदीची क्रेझ आणि शेवटच्या क्षणी सीट मिळवण्याची धडपड याचाच फायदा आता सायबर गुन्हेगार घेत आहेत.
सायबर गुन्हेगारांनी BookMyShow आणि District सारख्या प्रसिद्ध तिकीट प्लॅटफॉर्मची हुबेहूब नक्कल करणाऱ्या वेबसाइट्स तयार केल्या आहेत. वेबसाइटचा रंग, डिझाइन आणि लेआउट इतका खरा वाटतो की सामान्य लोकांना फसवणूक होतेय हे ओळखणं अवघड होतं.
या साइट्सवर “Limited Seats”, “Last Few Tickets” किंवा Countdown Timer सारखे मेसेज दाखवून वातावरण निर्माण केले जाते. सोशल मीडिया पोस्ट्स, Instagram Reels, Facebook जाहिराती आणि Google Search मधून या वेबसाइट्सचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला जात आहे.
एकदा तुम्ही UPI किंवा कार्डने पेमेंट केलं की, तुमच्या मोबाईलवर QR कोड आणि सीट नंबर असलेलं आकर्षक PDF तिकीट पाठवलं जातं. पण आपली फसवणूक झाली आहे हे स्टेडियमच्या गेटवर गेल्यावर समजतं. QR कोड स्कॅन होत नाही आणि बुकिंग आयडी पूर्णपणे बनावट असल्याचं लक्षात येतं.
विशेष म्हणजे, या ठगांकडे स्वतःचं एक “ऑपरेशन डॅशबोर्ड” असतं. मागणीनुसार तिकीटाचे दर बदलणे, ग्राहकांची माहिती गोळा करणे आणि पुढील फसवणुकीसाठी डेटा वापरणे, हे सगळं अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने चालत असल्याचं समोर आलं आहे.
फक्त पैसेच नाही, तर तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉपही धोक्यात येऊ शकतो. महागड्या सबस्क्रिप्शनपासून वाचण्यासाठी जे लोक “Free IPL Live Streaming” शोधतात, ते सायबर ठगांचे टार्गेट आहेत.
Telegram, Reddit आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक संशयास्पद लिंक्स शेअर केल्या जात आहेत. या लिंकवर क्लिक केल्यानंतर सामना सुरू होण्याऐवजी मालवेअर तुमच्या डिव्हाइसमध्ये घुसतो.
सायबर संशोधकांच्या माहितीनुसार, MacBook वापरणाऱ्यांना बनावट सिक्युरिटी अपडेटच्या माध्यमातून “SHub Stealer” नावाचा मालवेअर पाठवला जात आहे. हा मालवेअर तुमचे ब्राउझर पासवर्ड, बँकिंग डिटेल्स, Telegram Session, Cookies आणि अगदी Crypto Wallet ची माहितीही चोरू शकतो.
IPL ही भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल इव्हेंट्सपैकी एक आहे. कोट्यवधी प्रेक्षक, काही तासांत होणारे हजारो ऑनलाइन व्यवहार आणि सामन्यांबद्दलची प्रचंड क्रेझ यामुळे IPL सायबर गुन्हेगारांसाठी मोठा व्यवसाय बनला आहे.
विशेषतः प्लेऑफ किंवा मोठ्या सामन्यांच्या वेळी चाहते कोणतीही रिस्क घेऊन तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि नेमकं त्याच वेळी हे लोक सक्रिय होतात.
तज्ज्ञांच्या मते, तिकीट नेहमी अधिकृत आणि Verified प्लॅटफॉर्मवरूनच खरेदी करावं. सोशल मीडिया, WhatsApp किंवा Telegram वर मिळालेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये. “मोफत लाईव्ह मॅच” किंवा “अर्ध्या किंमतीत तिकीट” अशा ऑफरपासून सावध राहणं गरजेचं आहे.
तसेच बँकिंग अॅप्स आणि ई-मेलवर Two-Factor Authentication (2FA) सुरू ठेवावं. मोबाईलमध्ये अनोळखी अॅप्सना परवानगी देताना काळजी घ्यावी.
एक लक्षात ठेवा एका चुकीच्या क्लिकमुळे तुम्ही फक्त IPL तिकीटच गमावणार नाही, तर तुमचा संपूर्ण डिजिटल डेटा धोक्यात येऊ शकतो.