यंदाच्या इंडियन प्रिमियर लीग (IPL 2025) हंगामात सर्वात नामुष्कीजनक कामगिरी महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघाच्या नावावर नोंदली गेली आहे. 'आयपीएल'मध्ये प्रथमच 'सीएसके' संघ गणुतालिकेत तळात सर्वात शेवटच्या म्हणजे दहाव्या क्रमांकावर राहिला आहे. मात्र रविवारी (दि. २५ मे) चेन्नईने गुजरात टायटन्सवर मोठा विजय मिळवत यंदाच्या हंगमातील आपला शेवट गोड केला. यंदाच्या IPL हंगामात महेंद्रसिंह धोनीच्या ( MS Dhoni) खेळापेक्षा त्याच्या निवृत्तीवरच चर्चा झाली. धोनी पुढील IPL हंगाम खेळणार का? यावर माजी क्रिकेटपटूवर खल झाला. महेंद्रसिंह धोनी आयपीएलमधून निवृत्त होणार का?, हा मागील दोन हंगामांपासून विचाराला जाणारा प्रश्न रविवारीही उपस्थित झाला. यावर स्वत: धोनीने मौन सोडले मात्र पुन्हा एकदा सावधपणे भाष्य केले. त्यामुळे चाहत्यांचा संभ्रम वाढला आहे.
यंदा ऋतुराज गायकवाडकडे 'सीएसके' संघाचे नेत्तृत्व होते. मात्र दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतूनच बाहेर पडावे लागले. यानंतर धोनीकडे पुन्हा एकदा संघाचे नेतृत्त्व आले. यानंतरही संघाची सुमार कामगिरी कायम राहिली. यंदा एकुण १४ सामन्यांपैकी 'सीएसके'ने केवळ चार सामने जिंकले आहेत. त्यामुळेच धोनीचे वय, फिटनेस आणि फॉर्म यावर प्रचंड चर्चा झाली. ताे पुढील आयपीएल हंगामात खेळणार का, या प्रश्नावर अनेक माजी क्रिकेटपटूंनी आपले मत व्यक्त करत समालोचनावेळी एकमेकांशी वाद घालतानाही दिसले.
CSK च्या अंतिम सामन्यानंतर बोलताना धोनीने निवृत्तीवर पुन्हा एकदा सावधपणे भाष्य केले. तो म्हणाला की, “माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी पुढील ४-५ महिने आहेत; अजिबात घाई नाही. माझं शरीर तंदुरुस्त ठेवणं आवश्यक आहे. तुम्हाला सर्वोत्तम स्थितीत असणं गरजेचं आहे. एखाद्या खराब मोसमावरून खेळाडूंनी निवृत्ती घेतली, तर काहींना २२ व्या वर्षीच खेळ सोडावा लागेल.”
यंदाच्या आयपीएल हंगामाबाबत बोलताना धोनी म्हणाला की, “ यंदाचा हंगाम आमच्या संघासाठी चांगला नव्हता. क्षेत्ररक्षणात आम्ही खूप चुका केल्या. अखेरच्या सामन्यात आम्ही परिपूर्ण कामगिरी केली. आता यंदाच्या हंगामातील आयपीएलमधील आमच्या संघाचे सामने संपले आहेत. मी रांचीला परत जाईन आणि थोडे बाइक रायड्सचा आनंद घेईन. मी म्हणत नाही की मी संपलो आहे; पण मी परत येणार, असेही ठामपणे सांगू शकत नाही. माझ्याकडे वेळ आहे. विचार करून निर्णय घेईन.”
एकीकडे धोनी आपल्या निवृत्तीबाबत बोलला यानंतर याच मुद्यावरुन कॉमेंट्री बॉक्समध्ये माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि आकाश चोप्रा यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. आकाश चोप्राने सवाल केला की, धोनी ‘अनकॅप्ड’ (आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेला) भारतीय खेळाडू असता तर तो सीएसकेच्या संघात असता का?” यावर रैनाने उत्तर दिले की, “नक्कीच असता! तो 18 वर्षांपासून CSK सोबत आहे. अजूनही सरावात सर्वात जास्त षटकार ठोकतो. यावर आकाश चोप्राने पुन्हा सवाल केला की, टॉप ऑर्डर फेल झाल्यानंतर धोनी ७, ८, किंवा ९ क्रमांकावर का फलंदाजी करतो? तो फिट आहे का? यावर रैना म्हणाला की, धोनीला फलंदाजीसाठी शेवटच्या षटके सर्वात प्रभावी वाटतात. तो अजूनही ४४ व्या वर्षी विकेटकीपिंग करत आहे. तो शिवम दुबेसारख्या खेळाडूंना मंच उपलब्ध करून देतो.” यावेळी आरपी सिंगेही रैनाच्या विधानाचे समर्थन केले.
आयपीएलच्या पुढील हंगामात धोनीने खेळावे, असे चाहत्यांची इच्छा आहे. यावर माजी भारतीय क्रिकेटपटू मुरली कार्तिकने धोनीला भावनिक सल्ला दिला आहे. त्याने म्हटलं आहे की, धोनीने आता निवृत्तीचा विचार करायला हवा, कारण भावना कधी पश्चात्तापात बदलू नयेत. आपल्याला धोनी खूप प्रिय आहे, पण एक दिवस असतो जेव्हा ‘वेळ आली आहे’ हे मान्य करावं लागतं. आपण फेडररला, सचिनला किंवा कोहलीलाही थांबलेलं पाहायला नको होतं; पण त्यांनी शेवटी निरोप घेतलाच.जर आपण फार वेळ थांबलो, तर आपले सर्वात मोठे चाहतेही असं वाटायला लागतील की, तुम्ही थोडं जास्तच थांबला आहात.”