पुढारी ऑनलाईन डेस्क : चेन्नईने सोमवारी (१४ एप्रिल) आयपीएल साखळी सामन्यात लखनौ सुपर जायंटस्ला 5 गडी राखून पराभवाचा धक्का दिला. ( csk vs lsg 2025) चेन्नईसाठी हा सलग 5 पराभवानंतरचा पहिलाच विजय ठरला. चेन्नई संघाबरोबरच महेंद्रसिंह धोनीसाठीही (M S Dhoni ) हा सामना खास ठरला. धोनीने आपल्या शानदार फलंदाजीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलाच त्याचबरोबर दोन नवे विक्रमही आपल्या नावावर प्रस्थापित केले.
सोमवारच्या सामन्यात सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या धोनीने ११ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २६ धावा केल्या. त्याने शिवम दुबेसोबत ५० पेक्षा जास्त धावांची नाबाद भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात धोनीचवी सामनावीर म्हणून निवडण्यात आले. ४३ वर्षीय फलंदाज आयपीएलमध्ये हा पुरस्कार जिंकणारा सर्वात ज्येष्ठ क्रिकेटपटू ठरला आहे.
या सामन्यात धोनीने क्षेत्ररक्षक म्हणून नवा विक्रम केला. त्याने सर्वाधिक फलंदाजांना बाद करण्याचा विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे. धोनीने आयपीएलमध्ये २०१ वेळा फलंदाजांना तंबूत धाडले आहे. यामध्ये झेलबाद, यष्टचीत आणि धावबादचा समावेश आहे. विशेष म्हणजे समकालीन खेळाडूमध्ये विराट कोहली याने क्षेत्ररक्षक म्हणून ११६ फलंदाजांना बाद केले आहे.
सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर धोनी आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला. "आजही मी असेच विचारत होतो "ते मला सामनावीराचा पुरस्कार का देत आहेत?" नूरने खरोखरच चांगली गोलंदाजी केली. एखादा सामना जिंकणे चांगले असते. जेव्हा तुम्ही अशा प्रकारची स्पर्धा खेळता तेव्हा तुम्हाला सामने जिंकायचे असतात. मागील सामने कोणत्याही कारणास्तव आपल्या मनासारखे झाले नाहीत. त्याची अनेक कारणे असू शकतात. सामना जिंकणे संघाला आत्मविश्वास देते."
महेंद्रसिंग धोनी २०१
दिनेश कार्तिक १८२
एबी डिव्हिलियर्स १२६
रॉबिन उथप्पा १२४
वृद्धिमान साहा ११८
विराट कोहली ११६