स्पोर्ट्स

IPL History and Records : सर्वाधिक 'मेडन ओवर्स' टाकणारे टॉप-५ गोलंदाज; बुमराह अजून खूप मागे

टी-२० क्रिकेट हे प्रामुख्याने फलंदाजांचे वर्चस्व असलेले स्वरूप मानले जात असले, तरी स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्यासाठी गोलंदाजांची कामगिरी अत्यंत निर्णायक ठरते.

रणजित गायकवाड

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) इतिहासात आतापर्यंत अनेक दिग्गज गोलंदाजांनी आपल्या धारदार मा-याच्या जोरावर संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. टी-२० क्रिकेट हे प्रामुख्याने फलंदाजांचे वर्चस्व असलेले स्वरूप मानले जात असले, तरी स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्यासाठी गोलंदाजांची कामगिरी अत्यंत निर्णायक ठरते. आयपीएलच्या इतिहासात धावांची गती रोखत सर्वाधिक निर्धाव षटके (Maiden Overs) टाकणाऱ्या पहिल्या पाच गोलंदाजांचा घेतलेला हा आढावा...

भुवनेश्वर कुमार (सनरायझर्स हैदराबाद)

आपल्या स्विंग गोलंदाजीने फलंदाजांना जेरीस आणणारा भुवनेश्वर कुमार या यादीत अग्रस्थानी आहे. भुवनेश्वरने आतापर्यंत आयपीएलमधील १९० डावांमध्ये गोलंदाजी केली असून, २७.३३ च्या सरासरीने १९८ बळी टिपले आहेत. विशेष म्हणजे, त्याच्या नावावर आयपीएल कारकिर्दीत सर्वाधिक १४ मेडन ओवर्स टाकण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे.

प्रवीण कुमार (निवृत्त)

भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेल्या प्रवीण कुमारचा दबदबा आयपीएलमध्येही पाहायला मिळाला होता. त्याने ११९ डावांत ३६.१२ च्या सरासरीने ९० बळी घेतले होते. प्रवीण कुमारने आपल्या आयपीएल कारकिर्दीत एकूण १४ मेडन ओवर्स टाकले आहेत.

ट्रेंट बोल्ट (राजस्थान रॉयल्स)

न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याची जादू आयपीएलमध्ये आजही कायम आहे. आतापर्यंत १२० सामने खेळलेल्या बोल्टने २६.२ च्या सरासरीने १४३ बळी मिळवले आहेत. बोल्टने आतापर्यंत ११ मेडन ओवर्स टाकले असून, आगामी हंगामात त्याच्याकडे या यादीत अव्वल स्थानी पोहोचण्याची मोठी संधी असणार आहे.

इरफान पठाण (निवृत्त)

उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इरफान पठाणची कामगिरी आयपीएलमध्ये दीर्घकाळ स्मरणीय राहिली. २०१७ मध्ये आपला अखेरचा आयपीएल सामना खेळणाऱ्या इरफानने १०३ सामन्यांत ३३.११ च्या सरासरीने ८० बळी मिळवले. त्याने आपल्या कारकिर्दीत एकूण १० मेडन ओवर्स टाकण्याची किमया साधली आहे.

जसप्रीत बुमराह (मुंबई इंडियन्स)

जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक असलेला जसप्रीत बुमराह या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. बुमराहने आतापर्यंत १४५ आयपीएल सामन्यांत २२.०२ च्या प्रभावी सरासरीने एकूण १८३ बळी घेतले आहेत. बुमराहने आतापर्यंत एकूण ८ मेडन ओवर्स टाकले असून, त्याची अचूक यॉर्कर आणि टिच्चून केलेली गोलंदाजी फलंदाजांसाठी नेहमीच डोकेदुखी ठरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT