IPL Players Salary: इंडियन प्रीमियर लीग म्हणजे पैशांचा आणि ग्लॅमरचा पाऊस. पण आता या लीगमध्ये खेळाडूंना मिळणाऱ्या मानधनाबाबत एक धक्कादायक अंदाज समोर आला आहे. IPL चे माजी प्रमुख ललित मोदी यांनी केलेल्या विधानामुळे क्रिकेटविश्वात चर्चांना उधाण आलं आहे.
ललित मोदी यांच्या मते, 2030 पर्यंत IPL मध्ये टॉप खेळाडूंना एका सिझनसाठी तब्बल 150 कोटी रुपये मिळू शकतात. सध्या सर्वाधिक महागडा खेळाडू 25-27 कोटींच्या आसपास असताना हा अंदाज खूपच मोठा मानला जात आहे.
मोदी यांनी सांगितलं की, 2030 पर्यंत फ्रँचायझींची ‘प्लेयर पर्स’ सुमारे 100 मिलियन डॉलर (सुमारे 900 कोटी रुपये) होऊ शकते. याचा अर्थ एका सामन्यासाठीही खेळाडूंना कोट्यवधींचं मानधन मिळू शकतं.
मोदी यांनी विशेषतः जैकब बेथेल या इंग्लंडच्या युवा ऑलराउंडरचं उदाहरण दिलं. त्यांच्या मते, बेथेलसारखे खेळाडू पुढील काही वर्षांत IPL मध्ये सर्वाधिक कमाई करु शकतात.
21 वर्षीय बेथेलने Royal Challengers Bengaluru कडून IPL मध्ये पदार्पण केलं. कमी संधी मिळूनही त्याने आक्रमक फलंदाजी करत आपली छाप पाडली आहे.
सध्या IPL मध्ये टॉप खेळाडूला 27 कोटी रुपये आणि परदेशी खेळाडूला 25 कोटी रुपये दिले जातात. पण 150 कोटींचा अंदाज म्हणजे IPL आर्थिकदृष्ट्या आणखी मोठ्या उंचीवर जाणार, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
ललित मोदींच्या या विधानानंतर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. काहींना हा अंदाज वास्तव वाटतो, तर काही जण याला अतिशयोक्ती म्हणत आहेत.