IPL 2026 Schedule Start Date Final PSL Impact: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सर्व फ्रँचायझींना कळवले आहे की, IPL 2026 ची सुरुवात 26 मार्चपासून होणार असून अंतिम सामना 31 मे रोजी खेळवण्यात येणार आहे. आयपीएलच्या वेळापत्रकाच्या तारखा समोर आल्यानंतर पाकिस्तानमध्ये मात्र खळबळ उडाली आहे.
याचं कारण म्हणजे पाकिस्तान सुपर लीग (PSL) चा 11वा हंगामही 26 मार्चपासून सुरू होणार आहे, तर त्यांचा अंतिम सामना 3 मे रोजी होणार आहे. यामुळे IPL आणि PSL या दोन्ही टी20 लीग एकाच कालावधीत होणार आहेत. भारतात IPL ची लोकप्रियता शिखरावर असताना PSL खेळवली जाणार असल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
IPL आणि PSL एकाच वेळी झाल्यास PSL च्या प्रेक्षकसंख्येत मोठी घट होते, असा अनुभव याआधीही आला आहे. शिवाय, अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू IPL सोबत केलेल्या करारांमुळे पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळू शकत नाहीत. याचा थेट फटका PSL च्या कमाईवर होतो.
दरम्यान, IPL 2026 साठी मिनी ऑक्शन पूर्ण झाले असून 77 खेळाडूंवर एकूण 215.45 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमरून ग्रीन सर्वात महागडा ठरला. कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) त्याला 25.2 कोटी रुपयांना खरेदी केले.
याशिवाय मथीशा पाथिराना आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांच्यावरही संघांनी मोठी बोली लावली. IPL 2026 चे वेळापत्रक जाहीर झाल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची चिंता वाढल्याचं चित्र आहे.