

लखनौ : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बुधवारी (दि. 17) होणाऱ्या चौथ्या टी-20 लढतीत भारतीय संघ मालिका विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरेल, त्यावेळी शुभमन गिलसह कर्णधार सूर्यकुमार यादववर देखील फॉर्ममध्ये परतण्याचे आव्हान असणार आहे.
यापूर्वी, तिसऱ्या लढतीत 118 धावांचे माफक लक्ष्य असताना सूर्यकुमारला बहरात परतण्याची नामी संधी होती. मात्र, त्यावेळी त्याला दडपण झुगारता आले नव्हते. चौथ्या लढतीला सायंकाळी 7 पासून सुरुवात होईल.
एरवी, सूर्यकुमार यादवचे सहजसुंदर ओघवते फटके लक्ष वेधून घेणारे असतात. मात्र, अलीकडील कालावधीत त्याच फटक्यांची वानवा त्याच्या खेळीत जाणवते आहे. स्वत: सूर्यकुमारने याबाबत बोलताना माझ्या जे नियंत्रणात आहे, ते मी करत असल्याचे म्हटले आहे. ‘मी नेटस्मध्ये खूप चांगली फलंदाजी करत आहे. धावा व्हायच्या असतील, त्यावेळी त्या नक्कीच होतील, असे सूर्यकुमारने रविवारी धर्मशाळेतील लढतीनंतर नमूद केले होते.
सूर्यकुमार जवळपास वर्षभरापासून फॉर्ममध्ये परतण्यासाठी झगडत असून, या हंगामात त्याची सरासरी 15 पेक्षाही कमी राहिली आहे. विशेष म्हणजे, 2025 मध्ये त्याला अद्याप एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. या काळात केवळ दोनदाच तो 20 पेक्षा जास्त चेंडू खेळू शकला आहे.
उपकर्णधार शुभमन गिलचा संघर्षही तितकाच किंवा त्याहून अधिक चिंतेचा ठरतो आहे. शुभमनला सलामीला बढती दिल्यानंतर सातत्याने अपयशी ठरत आल्याने यामुळे मधल्या फळीवरही दडपण वाढले आहे. गिल संघात परतल्यानंतर त्याला संजू सॅमसनची जागा देण्यात आली. यामुळेही काही समीकरणे बदलली आहेत. सॅमसनला अभिषेक शर्मासोबत एक आश्वासक भागीदारी करूनही संघातून वगळण्यात आले होते.
एकूण सामने : 34
भारत विजयी : 20
द. आफ्रिका विजयी : 13
निकाल नाही : 1
स्थळ : लखनौ
वेळ : सायंकाळी 7.00 वा. पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस् नेटवर्क
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शाहबाज अहमद, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), हर्षित राणा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर.
दक्षिण आफ्रिका : एडन मार्कराम (कर्णधार), क्विंटॉन डी कॉक, रिझा हेंड्रिŠस, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्ज, डोनोव्हन फेरेरा, मार्को यान्सेन, लुथो सिपामला, ओटनील बार्टमन, एन्रिच नोर्त्जे, लुंगी एन्गिडी, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, जॉर्ज लिंडे.