GT vs RR Qualifier-2 Pudhari
स्पोर्ट्स

GT vs RR Qualifier-2: पावसामुळे सामना रद्द झाला तर फायनलमध्ये कोण जाणार? गुजरात की राजस्थान, नियम काय सांगतो?

GT vs RR Qualifier-2: गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील क्वालिफायर-2 सामन्यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुढारी वृत्तसेवा

GT vs RR Qualifier-2: IPL 2026 च्या फायनलसाठीची शर्यत आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. विद्यमान विजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आधीच अंतिम फेरीत धडक मारली असून आता दुसरा संघ कोणता असणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणाऱ्या क्वालिफायर-2 सामन्यातून फायनलचा दुसरा संघ ठरणार आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचे सावट असेल आणि सामना रद्द झाला, तर फायनलचे तिकीट कोणाला मिळणार? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.

याचं उत्तर IPL च्या नियमांमध्ये दडलं आहे. जर क्वालिफायर-2 सामना पावसामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे पूर्णपणे रद्द झाला आणि एकही चेंडू टाकता आला नाही, तर सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी प्रथम ‘सुपर ओव्हर’चा पर्याय तपासला जाईल.

मात्र, परिस्थिती इतकी बिघडली की सुपर ओव्हरही खेळता आली नाही, तर मग लीग स्टेजमधील गुणतालिकेच्या आधारे निर्णय घेतला जाईल. अशा परिस्थितीत गुजरात टायटन्सला मोठा फायदा होणार आहे.

कारण, IPL 2026 च्या लीग स्टेजनंतर गुजरात टायटन्स गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर होती, तर राजस्थान रॉयल्स चौथ्या स्थानावर होती. त्यामुळे सामना पूर्णपणे रद्द झाल्यास किंवा निकाल लागण्याची शक्यता नसेल, तर नियमांनुसार गुजरात टायटन्स थेट फायनलमध्ये पोहोचेल आणि राजस्थानचा प्रवास संपेल.

रविवारी 31 मे रोजी होणाऱ्या IPL फायनलमध्ये आधीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने स्थान निश्चित केले आहे. आता बंगळुरूचा सामना गुजरात टायटन्सशी होणार की राजस्थान रॉयल्सशी, याचा फैसला शुक्रवारच्या क्वालिफायर-2 सामन्यात होईल.

दरम्यान, हवामानाबाबत क्रिकेट चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, चंदीगड आणि आसपासच्या भागात गुरुवार ते शुक्रवारी सकाळपर्यंत काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. यासाठी ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे. मात्र, शुक्रवारी दिवसभर आणि सामन्याच्या वेळेत आकाश स्वच्छ राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

संध्याकाळी तापमान 35 अंश सेल्सिअसवरून 28 अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता असल्याने सामन्यासाठी वातावरण अनुकूल राहू शकते. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना पावसामुळे सामना रद्द होण्याची भीती सध्या तरी कमी असल्याचे चित्र आहे. आता सगळ्यांचे लक्ष एका प्रश्नाकडे लागले आहे. राजस्थान पुन्हा एकदा चमत्कार करणार की गुजरात टायटन्स फायनलचे तिकीट निश्चित करणार?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT