ipl 2025 virender sehwag warns vaibhav suryavanshi gives serious advice
मुंबई : वैभव सूर्यवंशीने विराट कोहलीप्रमाणेच दीर्घ कारकीर्द घडवण्यावर लक्ष केंद्रित करून आयपीएलमध्ये पुढची 20 वर्षे खेळण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. कोहलीलाने 19 व्या वर्षी खेळायला सुरुवात केली आणि सलग 18 हंगाम खेळत आहे. वैभवने ही गोष्ट अनुसरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण जर तो पदार्पणाच्या आयपीएलमधील कामगिरीवर खूश असेल आणि त्याला वाटत असेल की तो आता कोट्यधीश झाला आहे, मी पहिल्याच चेंडूवर षटकार मारला आहे, तर कदाचित आपण त्याला पुढच्या वर्षीच्या हंगामात पाहू शकणार नाही,’ असे स्पष्ट मत भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सहवागने ‘क्रिकबझ’शी बोलताना व्यक्त केले आहे.
14 वर्षीय युवा स्टार वैभव सूर्यवंशी सध्या आयपीएलमध्ये चर्चेचा विषय आहे. राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीने 1 कोटी 10 लाख रुपयांना विकत घेतलेल्या या युवा फलंदाजाने त्याचे आयपीएल पदार्पण धमाकेदार शैलीत केले. 19 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात त्याने करिअरच्या पहिल्याच आयपीएल चेंडूवर षटकार मारून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्या सामन्यात वैभवने 20 चेंडूत 34 धावांची शानदार खेळी केली. आरसीबीविरुद्धच्या सामन्यातही त्याने चमक दाखवली पण त्याचा डाव 12 चेंडूत फक्त 16 धावांवर संपुष्टात आला. वैभवने इतक्या लहान वयात त्याची प्रतिभा दाखवून दिली आहे. पण त्याला टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने इशारा दिला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या पराभवानंतर सेहवाग म्हणाला की, ‘वैभव सूर्यवंशी जर इतक्या यशाने खूश असेल तर तो पुढच्या वर्षी खेळताना दिसणार नाही. त्याने हुरळून जाता कामा नये. त्याने त्याचे पाय जमिनीवर ठेवण्यासाठी नेहमी अलर्ट रहावे आणि आपली कारकीर्द जास्तीत जास्त वर्षे कशी चालेल याकडे लक्ष द्यावे.’
सहवागने दावा केला, ‘आम्ही असे अनेक खेळाडू पाहिले आहेत, जे एक-दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून नाव कमावल्यानंतर पुढे काहीच करू शकले नाहीत. त्यांना वाटते की ते स्टार खेळाडू झाले आहेत.’ सेहवागने विराट कोहलीचे उदाहरण देत म्हटले, ‘वैभवने कोहलीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. खरंतर, अंडर-19 मधून आयपीएलमध्ये आलेल्या अनेक खेळाडूंची यादी आहे, जे आयपीएलमध्ये अपयशी ठरले आणि त्यानंतर ते कायमचे गायब झाले. यामध्ये उनमुक्त चंद याचाही समावेश आहे. खराब कामगिरीमुळे त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.’
वैभव हा आयपीएल खेळणारा सर्वात तरुण खेळाडू आहे. त्याने प्रयास रे बर्मनचा विक्रम मोडला. 31 मार्च 2019 रोजी, प्रयासने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पदार्पण केले होते. त्यावेळी, प्रयास हा 16 वर्षे 157 दिवसांचा होता. तर वैभवने 14 वर्षे आणि 23 दिवसांच्या वयात आयपीएलमध्ये पदार्पण केले.
वैभवने पहिल्या सामन्यात आपल्या अप्रतिम प्रतिभेचे प्रदर्शन केले आणि यशस्वी जैस्वालसोबत मिळून 85 धावांची भागीदारी करण्यात यशस्वी ठरला होता. वैभवने अंडर-19 मध्येही ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार दिवसीय सामन्यात शानदार शतक ठोकले आहे.