

IPL 2025 MS Dhoni 400th T20 Match
चेन्नई : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याच्या टी-20 कारकिर्दीतील 400 वा सामना खेळणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना चेपॉक स्टेडियमवर रंगणार आहे. तो 400 टी-20 सामने खेळणारा चौथा भारतीय खेळाडू ठरणार आहे.
400 टी-20 सामने खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा अव्वल स्थानावर आहे. रोहितने 456 टी-20 सामने खेळले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दिनेश कार्तिकने 412 टी-20 सामने खेळले आहेत. स्टार फलंदाज विराट कोहली तिसऱ्या स्थानावर आहे. विराटच्या नावावर 407 टी-20 सामने नोंदले आहेत.
धोनीने 98 टी-20 सामने खेळले आहेत. या काळात त्याने 126.13 च्या स्ट्राईक रेटने 1617 धावा केल्या आहेत. पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने 272 सामने खेळले आहेत. या काळात त्याने 137.87 च्या स्ट्राईक रेटने 5377 धावा केल्या. याशिवाय, धोनीने झारखंडसाठी देशांतर्गत क्रिकेट आणि चॅम्पियन्स लीगमध्ये एकूण 24 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने एकूण 449 धावा केल्या आहेत.
आयपीएल 2024 मध्ये हैदराबादने पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील शानदार कामगिरी करून अंतिम फेरीत धडक मारली होती. पण यंदाच्या हंगामात मागील वर्षीची लय कायम राखण्यात हा संघ अपयशी ठरला आहे. मोजकेच सामने वगळता एसआरएचच्या फलंदाजी युनिटला अपेक्षा पूर्ण करता आलेल्या नाहीत. यामुळे संपूर्ण हंगामात संघाची कामगिरी निराशाजनक झाली आहे. असे असले तरी हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी यांना आशा आहे की संघ लवकरच विजयी मार्गावर परतेल.