

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या इतिहासात कधी कुणी कल्पनाही केली नसेल की 14 वर्षांचा एक मुलगाही या लीगमध्ये खेळताना दिसेल. केवळ 13 वर्षांचा असताना आयपीएल लिलावात विकला गेलेला वैभव सूर्यवंशी याने संस्मरणीय असे पदार्पण केले. त्याच्या या अद्भूत कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. साधारणपणे जेव्हा एखादा खेळाडू पदार्पणासाठी मैदानात उतरतो, तेव्हा तो घाबरलेला आणि संकोचलेला असतो. मात्र, वैभवची गोष्ट काहीशी वेगळी होती. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवातच एक उत्तुंग षटकार खेचून केली.
वैभवच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवर निघालेला हा षटकार एवढं सांगण्यासाठी पुरेसा होता की बिहारचा हा लाल या मंचावर निर्भीडपणे खेळण्यास सज्ज असून गोलंदाजांच्या मनात धडकी भरवण्यासाठी आला आहे. पण सत्य हेही आहे की 14 वर्षाच्या या मुलाने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप त्याग केले आहेत. वैभवला मटण खूप आवडतं आणि पिझ्झाही त्याचा आवडता खाद्यपदार्थ आहे, पण क्रिकेटमध्ये करिअर घडवण्यासाठी त्याने या दोन्ही आवडीच्या गोष्टींचा त्याग केला.
‘वैभवला मटण खायचे नाही, अशी स्पष्ट सूचना दिली गेली आहे. पिझ्झा त्याच्या डायेटमधून काढून टाकण्यात आला आहे. वैभवला चिकन आणि मटण खूप आवडते. तो अजून लहान आहे आणि त्यामुळे त्याला चवीला चटपटीत असणारा पिझ्झाही खूप आवडतो. मात्र, आता तो पिझ्झा खात नाही. जेव्हा आम्ही त्याला खायला मटण द्यायचो, तेव्हा तो त्याचा फडशा पाडायचा. त्यामुळेच तो थोडासा गोलमटोल आहे. पण त्याची क्रिकेट कारकीर्द मोठी असेल. त्याचे आयपीएल पदार्पण जबरदस्त झाले आहे. तो पुढच्या सामन्यांमध्ये मोठ्या खेळी खेळेल.’ असा विश्वास वैभव सूर्यवंशीचे प्रशिक्षक मनीष ओझा यांनी व्यक्त केला. त्यांनी इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितले.
प्रशिक्षक मनीष यांच्या मते, वैभवमध्ये युवराज सिंग सारखी आक्रमकता आहे. तो निडर फलंदाज आहे. तो ब्रायन लाराच्या डावखु-या फलंदाजीचा चाहता आहे. मात्र, वैभव म्हणजे युवराज सिंग आणि ब्रायन लारा यांचा अनोखा संगम असल्याचे मला वाटते.’
‘वैभव सूर्यवंशी सर्व तरुणांसाठी प्रेरणादायी असाच आहे. त्याने आयपीएल सारख्या मोठ्या मंचांवर खेळण्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवण्यासाठी त्याने संघर्षाचा मार्ग स्विकारला. त्याचे समर्पण, मेहनत आणि शिस्तबद्ध जीवनशैली याचे हे उत्तम उदाहरण आहे. यश मिळवण्यासाठी केवळ टॅलेंट नव्हे, तर त्याग आणि दृढ निश्चयही तितकाच महत्त्वाचा असतो,’ असा सल्ला मनीष यांनी आजच्या तरुण क्रिकेटर्सना दिला.
वैभवने शनिवारी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. त्याने केवळ 20 चेंडूंमध्ये 34 धावांची जोरदार खेळी साकारली. या खेळीत त्याने 2 चौकार आणि 3 गगनचुंबी षटकार ठोकले. विशेष म्हणजे, त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर एक शानदार षटकार लगावला. त्याचा आत्मविश्वास आणि फलंदाजीचा अंदाज प्रेक्षकांना खूपच भावला. मात्र, त्याची ही शानदार खेळी व्यर्थ गेली. कारण राजस्थान रॉयल्सला हा सामना जिंकता आला नाही आणि संघाला 2 धावांनी पराभव पत्करावा लागला.