IPL 2025, Shreyas Iyer fine, Punjab Kings vs CSK file photo
स्पोर्ट्स

IPL 2025 | सामना जिंकूनही श्रेयस अय्यर अडचणीत! संघाच्या एका चुकीसाठी BCCI ने दिली लाखोंची शिक्षा

Punjab Kings vs CSK |

मोहन कारंडे

IPL 2025 Shreyas Iyer fine Punjab Kings vs CSK

चेन्नई : आयपीएल २०२५ च्या हाय-व्होल्टेज सामन्यात, पंजाब किंग्जच्या संघाने चेन्नई सुपर किंग्जला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत केले. पंजाबने हा सामना ४ विकेट्सने जिंकला. पंजाबकडून त्यांचा स्टार फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने हॅटट्रिक घेतली. कर्णधार श्रेयस अय्यरनेही ७२ धावांची विजयी खेळी खेळली. असे असूनही, श्रेयस अय्यरला संघाच्या चुकीबद्दल बीसीसीआयने दंड ठोठावला आहे.

श्रेयस अय्यरला दंड

पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरला स्लो ओव्हर रेटसाठी बीसीसीआयने दंड ठोठावला आहे. या हंगामात पंजाब किंग्जची ही पहिली चूक होती. त्यामुळे अय्यर याला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. या सामन्यात प्रभसिमरन सिंगचे अर्धशतक आणि युजवेंद्र चहलची हॅटट्रिक देखील पाहण्यासारखी होती. पंजाबने सीएसकेचा चार विकेट्सने पराभव केला आणि त्यांना प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर काढले.

आयपीएलचा नियम काय?

चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना झाला. आयपीएलच्या नियमांनुसार श्रेयस अय्यरवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या नियम २.२ नुसार, जर एखाद्या संघाने निर्धारित वेळेत षटके पूर्ण केली नाहीत, तर त्या संघाच्या कर्णधाराला दंड आकारला जातो.

अय्यर आणि सिंगने पंजाबच्या विजयाचा पाया केला भक्कम

बुधवारच्या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना १९.२ षटकांत सर्वबाद १९० धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने १९.४ षटकांत ६ बाद १९४ धावांसह विजय मिळवला. १९१ धावांचे आव्हान असताना कर्णधार श्रेयस अय्यर (४१ चेंडूंत ७२) व प्रभसिमरन सिंग (३६ चेंडूंत ५४) यांनी ७२ धावांची भरभक्कम भागीदारी केली. यामुळे पंजाबच्या विजयाचा पाया भक्कम झाला होता. फिरकीपटू युजवेंद्र चहलने एकाच षटकात हॅ‌ट्ट्रिकसह ४ बळी घेतल्यानंतर पंजाब सुपर किंग्जने आयपीएल साखळी सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा एकतर्फी धुव्वा उडवला. शिवाय, त्यांचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आणले.

युजवेंद्रची १९ व्या षटकात हॅ‌ट्ट्रिक

तत्पूर्वी, पंजाब किंग्जचा गोलंदाज चहलने या लढतीतील १९ व्या षटकात तीन फलंदाज ओळीने गारद करून हॅट्ट्रिक केली. त्याने चौथ्या चेंडूवर दीपक हुडा, पाचव्या चेंडूवर अंशुल कंबोज तर शेवटच्या चेंडूवर नूर अहमदला बाद करत हॅट्ट्रिक पूर्ण केली. याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याने महेंद्रसिंह धोनीला बाद केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT