vaibhav suryavanshi age controversy
मुंबई : राजस्थान रॉयल्स (RR)चा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 मध्ये धमाल करत आहे. 14 वर्षीय वैभवने गुजरात टायटन्स (GT) विरुद्धच्या सामन्यात फक्त 35 चेंडूत शतक झळकावले. यासह, वैभव आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक फटकावणारा भारतीय खेळाडू बनला. मात्र त्यानंतर गुरुवारी (दि. 1) मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याला काही विशेष कामगिरी करता आली नाही. एमगोलंदाजांनी त्याला खाते न उघडताच तंबूत पाठवले.
वैभव सूर्यवंशीने 19 एप्रिल 2025 रोजी लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले. आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात त्याने शार्दुल ठाकूरला पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून आपल्या आयपीएल करिअरची धमाकेदार सुरुवात केली. त्यानंतर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्धच्या सामन्यात, वैभवने भुवनेश्वर कुमारला लक्ष्य केले आणि दोन षटकार मारले. तर गुजरातविरुद्धच्या सामन्यात त्याने शतकी खेळी साकारून चमत्कार केला.
आयपीएलमध्ये विक्रमी खेळी केल्यानंतर वैभव सूर्यवंशीच्या खऱ्या वयाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वैभवची एक जुनी मुलाखत पुन्हा व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की तो सप्टेंबर 2023 मध्ये 14 वर्षांचा होईल. याचा अर्थ, जर वैभवच्या विधानाला आधार म्हणून घेतले तर या वर्षी 23 सप्टेंबर रोजी त्याचे वय 16 वर्षे होईल.
दरम्यान, आयपीएल रेकॉर्ड बुकनुसार वैभव सूर्यवंशीचा जन्म 27 मार्च 2011 रोजी झाला असून त्याचे सध्याचे वय 14 वर्षे आणि 36 दिवस आहे. प्रसिद्ध सांख्यिकीतज्ज्ञ मोहनदास मेनन यांनी वैभवच्या वयाबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते. मोहनदास यांनी त्या जुन्या मुलाखतीचा उल्लेख केला होता आणि म्हटले होते की वैभवच्या वास्तविक वयाबद्दल यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो.
वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी यानी वैभववर झालेल्या वयाच्या फसवणुकीचे आरोप फेटाळले आहेत. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ‘जेव्हा तो साडेआठ वर्षांचा होता तेव्हा त्याने पहिल्यांदा बीसीसीआय बोन चाचणी दिली. तो आधीच भारताकडून अंडर-19 खेळला आहे. आम्हाला कोणाचीही भीती नाही. आम्ही पुन्हा वय चाचणी देण्यास तयार आहे.’
वैभव सूर्यवंशी यांच्या वयावरून प्रश्न उपस्थित झाल्यानंतर बीसीसीआयच्या TW3 (Tanner-Whitehouse 3) चाचणीबद्दल चर्चा वाढली आहे. ही चाचणी खेळाडूंच्या वयाची पडताळणी तसेच वयोगटानुसार योग्य पात्रता सुनिश्चित करण्यासाठी वापरली जाते.
बीसीसीआयने वय फसवणूक रोखण्यासाठी TW3 चाचणी अनिवार्य केली आहे. सर्व राज्य संघटनांमध्ये, खेळाडूंचे एक्स-रे बीसीसीआयच्या निरीक्षकांच्या उपस्थितीत घेतले जातात आणि नंतर दोन स्वतंत्र रेडिओलॉजिस्टकडून त्यांचे मूल्यांकन केले जाते.
TW3 चाचणी ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे ज्यामध्ये डाव्या हाताच्या मनगटाचे एक्स-रे घेऊन, हाडांच्या वाढीच्या टप्प्यांवरून जैविक वय (bone age) ठरवले जाते. या प्रक्रियेत 20 हाडांचे निरीक्षण केले जाते, जे सुरुवातीला cartilage ने विभक्त असतात आणि वय वाढल्यास ते एकत्र येतात. ही चाचणी मुख्यतः 16 वर्षांखालील खेळाडूंमध्ये प्रभावी आहे. 16 वर्षांनंतर हाडांची वाढ पूर्ण झाल्यामुळे, TW3 चाचणीची उपयुक्तता कमी होते.
बीसीसीआयच्या धोरणानुसार, TW3 चाचणीमध्ये मुलांसाठी 16.4 किंवा त्यापेक्षा कमी आणि मुलींसाठी 14.9 किंवा त्यापेक्षा कमी स्कोअर आवश्यक आहे. ही चाचणी खेळाडूच्या संपूर्ण कारकिर्दीत एकदाच घेतली जाते आणि ती सर्व वयोगटांच्या स्पर्धांसाठी वैध असते.
सध्या, फक्त राज्य संघटना खेळाडूंची चाचणी घेण्यात येते, जी बीसीसीआय निरीक्षकांच्या उपस्थितीत केली जाते. येथे चाचणी केल्यानंतर, नमुना तज्ञांकडे पाठवला जातो, त्यानंतर त्याचा रिपोर्ट मिळतो. 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीरच्या रसिक सलाम दारने वयाची फसवणूक केली होती. त्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली होती. त्याच्याशिवाय मनजोत कालरा, अंकित बावणे यांसारख्या खेळाडूंची नावेही वय फसवणूक प्रकरणात समाविष्ट आहेत.