ipl 2025 playoffs mumbai indians in trouble before eliminator match
इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) मध्ये मुंबई इंडियन्स (MI) चा मार्ग सोपा दिसत नाही. पंजाब किंग्ज (PBKS) कडून पराभव पत्करल्यानंतर ते पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर गेले. एलिमिनेटरमध्ये त्यांना गुजरात टायटन्स (GT) किंवा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) या संघाशी सामना करावा लागेल. पण त्याआधी एमआयला मोठा धक्का बसला असून त्यांच्या 3 खेळाडूंनी संघाला निरोप दिला आहे. त्याच्या जाण्याने कर्णधार हार्दिक पंड्याची डोकेदुखी वाढली आहे.
रायन रिकेल्टन, कॉर्बिन बॉश आणि विल जॅक्स हे खेळाडू त्यांच्या राष्ट्रीय संघाच्या सामन्यांमुळे मायदेशी परतले आहेत. रिकेल्टन आणि बॉश हे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी द. आफ्रिकेच्या कसोटी संघात सामील होणार आहेत, तर जॅक 29 मे पासून वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी इंग्लंड संघात दाखल होईल.
मुंबई इंडियन्सने या तिन्ही विदेशी खेळाडूंच्या निरोपाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने हे तिन्ही खेळाडूंवर भावनिक भाषण देताना दिसत आहेत. या तीन विदेशी खेळाडूंच्या जाण्यामुळे मुंबई इंडियन्स संघात महत्त्वाचे बदल झालेले आहेत.
संपूर्ण हंगामात यष्टीरक्षक रिकेल्टन आणि जॅक हे संघाचे महत्त्वाचे भाग होते. रिकल्टनने 14 सामन्यांमध्ये 3 अर्धशतकांसह 388 धावा केल्या. विल जॅक्सने 13 सामन्यांच्या 11 डावात 233 धावा केल्या. यामध्ये 1 अर्धशतक समाविष्ट आहे. याशिवाय त्याने 6 विकेट्सही घेतल्या. बॉशने 3 सामन्यांच्या 2 डावात 47 धावा केल्या. त्याचा सर्वाधिक स्कोअर 32 राहिला. याशिवाय त्याने 1 विकेटही घेतली. या तिन्ही खेळाडूंच्या जागी मुंबई इंडियन्सने जॉनी बेअरस्टो, रिचर्ड ग्लीसन आणि चरिथ असलंका यांना संघात घेतले आहे.