स्पोर्टस् हर्नियाच्या शस्त्रक्रियेनंतर आगामी आशिया चषकासाठी पूर्णपणे तंदुरुस्त
सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये 6 आठवड्यांची पुनर्वसन प्रक्रियेची पूर्तता
आगामी आशिया
चषकात नेतृत्वाची
धुरा सांभाळण्यासाठी पूर्ण सज्ज
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय टी-20 संघाचा धडाकेबाज फलंदाज आणि कर्णधार सूर्यकुमार यादव दुखापतीतून सावरून पुन्हा एकदा मैदानावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. शस्त्रक्रिया आणि त्यानंतरच्या पुनर्वसनाच्या खडतर काळातून जाताना, या सक्तीच्या विश्रांतीकडे संकट म्हणून नव्हे, तर पुनरागमनाची सर्वोत्तम संधी म्हणून पाहिले, असा आत्मविश्वास त्याने याप्रसंगी व्यक्त केला.
‘आयपीएल’च्या अखेरीस झालेल्या स्पोर्टस् हर्नियाच्या त्रासामुळे सूर्यकुमारवर जर्मनीतील म्युनिक येथे शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर बंगळूर येथील ‘बीसीसीआय’च्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये त्याने 6 आठवड्यांची पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण केली. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त असून, 9 सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होणार्या आशिया चषकात भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे.
‘बीसीसीआय’ने प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडीओमध्ये बोलताना सूर्यकुमार म्हणाला, सध्या मला खूप छान वाटत आहे. गेल्या पाच-सहा आठवड्यांची पुनर्वसन प्रक्रिया आणि दिनचर्या अतिशय उत्तम होती. या काळात मी स्वतःला मानसिक आणि शारीरिकद़ृष्ट्या अधिक मजबूत करण्यावर भर दिला. ‘आयपीएल’ संपण्याच्या सुमारास मला या दुखापतीची जाणीव झाली. गेल्या वर्षीही मला असाच त्रास झाला होता, त्यामुळे लक्षणे लगेच ओळखता आली. एमआरआय केल्यानंतर निदान स्पष्ट झाले आणि शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. गेल्या वेळच्या अनुभवामुळे पुनर्वसन प्रक्रिया कशी असेल, याची मला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे मी प्रत्येक टप्प्यासाठी मानसिकद़ृष्ट्या तयार होतो.
बंगळूर येथील सेंटर ऑफ एक्सलन्समधील सुविधांचे सूर्यकुमारने तोंडभरून कौतुक केले. तो म्हणाला, तेथील फिजिओ आणि प्रशिक्षकांना माझ्या शरीराची ठेवण आणि गरजा अचूक माहीत होत्या. त्यानुसार त्यांनी माझ्या व्यायामाचे नियोजन केले. यामुळे मला लवकर तंदुरुस्त होण्यास मदत झाली. येथील सेंटर खूप भव्य आहे. येथील जिममध्ये एकाच वेळी 30-35 खेळाडू सराव करू शकतात. अनेक अत्याधुनिक उपकरणे केवळ पुनर्वसनासाठीच नव्हे, तर नियमित सरावासाठीही अत्यंत उपयुक्त आहेत.