स्ट इंडिजविरुद्ध पुढील महिन्यात होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आज (दि. २५) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.  Pudhari Photo
स्पोर्ट्स

India Squad For WI Test Series : भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कसोटी संघाची घोषणा, नायरला वगळले; जडेजा उपकर्णधार

दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २ ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्‍ये खेळवला जाणार

पुढारी वृत्तसेवा

India Squad For WI Test Series : वेस्ट इंडिजविरुद्ध पुढील महिन्यात होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आज (दि. २५) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. भारतीय संघाचे नेतृत्त्‍व शुभमन गिल करणार असून, रवींद्र जडेजाकडे उपकर्णधारपदी धुरा सोपविण्‍यात आली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २ ऑक्टोबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

पंतच्या अनुपस्थितीत जुरेलकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी

टीम इंडियाचा अनुभवी यष्टीरक्षक ऋषभ पंत अजूनही दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. त्‍यामुळे वेस्ट इंडिजविरुद्ध ध्रुव जुरेल यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळेल. इंग्लंड दौऱ्यावेळी पंतकडे उपकर्णधारपदाचीही जबाबदारी सोपविण्‍यात आली होती. मात्र या मालिकेत तो जखमी झाला. आता ही जबाबदारी रवींद्र जडेजाला देण्यात आली आहे. जुरेलने इंग्लंड दौऱ्यावरही पंतच्या अनुपस्थितीत यष्टीरक्षणाची भूमिका पार पाडली होती. यष्टीरक्षक म्हणून जुरेल पहिली पसंती आहे, तर एन जगदीशनलाही राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे.

बुमराहला विश्रांती नाही

आशिया चषकात भारतीय वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करणाऱ्या जसप्रीत बुमराहला वेस्ट इंडिजविरुद्ध विश्रांती देण्यात आलेली नाही. इंग्लंड दौऱ्यात बुमराहवरील अतिरिक्‍त भाराची काळजी घेण्यात आली होती. तो मालिकेतील पाचपैकी फक्त तीनच सामने खेळला होता. त्यामुळे व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रक पाहता त्याला या मालिकेतून विश्रांती दिली जाईल असे मानले जात होते, पण तसे झाले नाही. बुमराहचा प्लेइंग-११ मध्ये समावेश होण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यासोबत मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्‍यावर वेगवान गोलंदाजीची धुरा असेल.

करुण बाहेर, सरफराजलाही संधी नाही

इंग्लंड दौऱ्यातून आठ वर्षांनंतर भारतीय संघात परतलेल्या करुण नायरला वेस्ट इंडिजविरुद्धच्या संघात स्थान मिळाले नाही. इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्‍याची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नाही. ओव्हलवर इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत अर्धशतक झळकावणाऱ्या करुणने सर्व डावांमध्ये चांगली सुरुवात केली होती, पण त्याला मोठ्या खेळीत रूपांतर करता आले नाही. त्यानंतर त्याच्या बोटाला दुखापत झाली आणि तो दिलीप ट्रॉफी खेळू शकला नाही. दुसरीकडे, सरफराज खानला पुन्हा एकदा कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. सरफराजने गेल्या काही काळापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर धावा केल्या होत्या, पण निवड समितीने त्याला या मालिकेसाठी निवडले नाही.

श्रेयस अय्यरचा कसोटी क्रिकेटमधून ब्रेक

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर होण्यापूर्वी बीसीसीआयने श्रेयस अय्यरने कसोटी क्रिकेटमधून सहा महिन्यांची विश्रांती घेतल्याची पुष्टी केली होती. . बीसीसीआयने सांगितले होते की श्रेयसची ब्रिटनमध्ये शस्त्रक्रिया झाली होती आणि तो त्यातून सावरत आहे. अलीकडे कसोटी क्रिकेट सामन्‍यात त्‍याला फॉर्म गवसलेला नाही. श्रेयसला या काळात त्याच्या फिटनेसवर काम करायचे आहे. श्रेयसच्या या निर्णयामुळे बीसीसीआयने त्याला इराणी चषकासाठीही निवडले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT