स्पोर्ट्स

Mirabai Chanu Gold Medal : राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये मीराबाई चानूची सुवर्ण पदकाला गवसणी

स्पर्धेत तिला आव्हान देणारी दुसरी कोणतीही तगडी स्पर्धक नसल्याने, चानूची स्पर्धा जणू स्वतःशीच होती.

रणजित गायकवाड

mirabai chanu wins gold medal at commonwealth championships

अहमदाबाद : भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत, विक्रमी कामगिरीसह सोमवारी येथे झालेल्या राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये अपेक्षित सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. टोकिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या चानूने एकूण 193 किलो (84 किलो + 109 किलो) वजन उचलून स्नॅच, क्लीन अँड जर्क आणि एकूण वजनामध्ये राष्ट्रकुल चॅम्पियनशिपचे नवे विक्रम प्रस्थापित केले. यासह तिने महिलांच्या 48 किलो वजनी गटात अव्वल स्थान पटकावले.

दुखापतीमुळे जवळपास वर्षभराच्या विश्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करणार्‍या 31 वर्षीय चानूच्या कामगिरीत सरावाचा अभाव काहीसा दिसून आला. तिला सहापैकी केवळ तीनच प्रयत्नात यशस्वी लिफ्ट घेता आली. स्नॅच प्रकारात 84 किलोचा पहिला प्रयत्न करताना तिच्या उजव्या गुडघ्यात अस्वस्थता जाणवली आणि तो अयशस्वी ठरला. तथापि, दुसर्‍या प्रयत्नात तिने हेच वजन यशस्वीपणे उचलले. तिचा 89 किलो वजनाचा तिसरा प्रयत्न अयशस्वी ठरला.

स्पर्धेत तिला आव्हान देणारी दुसरी कोणतीही तगडी स्पर्धक नसल्याने, चानूची स्पर्धा जणू स्वतःशीच होती. तिने क्लीन अँड जर्कमध्ये 105 किलो वजनाने सुरुवात केली. त्यानंतर तिने कामगिरीत सुधारणा करत 109 किलो वजन उचलले; परंतु तिचा 113 किलोचा अंतिम प्रयत्न अयशस्वी ठरला.

या स्पर्धेत मलेशियाच्या आयरीन हेन्रीने 161 किलो (73 किलो + 88 किलो) वजन उचलून रौप्यपदक जिंकले, तर वेल्सच्या निकोल रॉबर्टस्ने 150 किलो (70 किलो + 80 किलो) वजनासह कांस्यपदकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेच्या निमित्ताने चानूने 48 किलो वजनी गटात पुनरागमन केले आहे. याच वजनी गटात तिने विश्वविजेतेपद आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दोन पदके जिंकली होती, मात्र 2018 नंतर ती या गटात सहभागी झाली नव्हती. या स्पर्धेतील कनिष्ठ गटात सौम्या दळवीने सुवर्णपदक पटकावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT