भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग यांच्या नेतृत्त्वाखालील इंडिया चॅम्पियन्स संघाने शनिवारी (१३ जुलै) वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स चषकावर आपलं नाव कोरलं. अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पाच गडी राखून दणदणीत पराभव केला. या विजयानंतर युवराज सिंगने आपल्या पसंतीची सर्वकालीन सर्वोत्तम (ऑल टाइम बेस्ट) संघाची निवड केली. या संघात त्याने भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला स्थान दिलेले नाही. तसेच त्याने स्वत:लाही या संघात १२ खेळाडू म्हणून निवडले आहे. जाणून घेवूया युवराज सिंग याने निवडलेल्या 'ऑल टाइम बेस्ट' संघातील खेळाडू.
युवराज सिंगने आपल्या पसंतीची सर्वकालीन सर्वोत्तम क्रिकेट संघात केवळ तीन भारतीय क्रिकेटपटूंना स्थान दिले आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या चार माजी क्रिकेटपटूंचा समावेश केला आहे.
युवराज सिंग याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि सचिन तेंडुलकरची सलामीवीर म्हणून निवड केली आहे. युवराजने तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आणि चौथ्या क्रमांकावर विराट कोहलीला स्थान दिले आहे. दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्स तसेच इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू फ्लिंटॉफचाही त्याच्या सर्वकालीन प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला.आपल्या संघात त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर ॲडम गिलख्रिस्टची यष्टिरक्षक म्हणून निवड केली. संघात ४ गोलंदाजांचा समावेश केला असून, यामध्ये मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न, ग्लेन मॅकग्रा आणि वसीम अक्रम यांचा समावेश आहे.
सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, रोहित शर्मा, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ॲडम गिलख्रिस्ट, शेन वॉर्न, मुथय्या मुरलीधरन, ग्लेन मॅकग्रा, वसीम अक्रम, अँड्र्यू फ्लिंटॉफ.