नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
भारताचा माजी फलंदाज युवराज सिंग याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भारताच्या तीन कर्णधारांविषयी आपला अनुभव परखडपणे सांगितला. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सौरभ गांगुलीने आपल्याला महेंद्रसिंह धोनी आणि विद्यमान कर्णधार विराट कोहलीपेक्षा जास्त सपोर्ट केला, असे वक्तव्य केले. युवराजने सध्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलींनी एक अष्टपैलू म्हणून मला पाठिंबा दिलेल्याच्या अनेक आणि भरपूर आठवणी आहेत.
युवराज स्पोर्ट्सस्टारशी बोलताना म्हणाला 'मी सौरभ गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळलो आणि मला त्याच्याकडून खूप पाठिंबा मिळाला. त्यानंतर महेंद्रसिंह धोनीने नेतृत्व आपल्या हातात घेतले. सौरभ गांगुली आणि महिंद्रसिंह धोनी यांच्यातील कोणा एकाची निवड करणे अवघड आहे. गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळताना माझ्या अनेक आठवणी आहेत कारण त्याने त्या प्रकारे मला वेळोवेळी पाठिंबा दिला होता. त्या प्रकारचा पाठिंबा मला धोनी आणि विराटच्या नेतृत्वाखाली मिळाला नाही.'
युवराजने 2011 च्या विश्वचषक जिंकण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यानंतर त्याला कर्करोगामुळे बराच काळ मैदानापासून लांब रहावे लागले होते. कर्करोगावर मात करत त्याने पुनरागमन केले पण, त्याला आपल्या लौकीकास साजेसा खेळ करता आला नाही. अखेर जून 2019 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
युवराजने 2007 च्या टी – 20 विश्वचषकातही दमदार कामगिरी करत विश्वचषक पटकावण्यात मोलाची भुमिका बजावली होती. सध्या युवराज कोरोना महामारी संकटाच्या पार्श्वभूमीवर इतर क्रिकेटर्स सारखा घरातच थांबून याचा मुकाबला करत आहे. त्याने लॉकडाऊनच्या काळात आपल्या चाहत्यांना घरात रहाण्याचे आवाहन केले आहे.