India Vs West Indies 2nd Test :
भारतानं वेस्ट इंडीजविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी विजयाची औपचारिकता पूर्ण केली. केएल राहुलनं नाबाद अर्धशतक झळकावत भारताला विजयी सीमोल्लंघन करून दिलं. भारतानं दोन कसोटी सामन्यांची मालिका २ - ० अशी जिंकली. याचबरोबर भारतीय संघानं WTC Point Table मध्ये तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
सामन्यात ८ विकेट्स घेणाऱ्या कुलदीप यादवला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तर मालिकावीर म्हणून रविंद्र जडेजाची निवड करण्यात आली.
वेस्ट इंडीज विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचं झालं तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतानं आपला पहिला डाव ५१८ धावांवर घोषित केला होता. भारताकडून सलामीवीर यशस्वी जयस्वालनं १७५ धावांची दमदार खेळी केली. त्यानंतर कर्णधार शुभमन गिलनं नाबाद १२९ धावांचं योगदान दिलं.
या दोघांना साई सुदर्शन ८७, नितीश कुमार रेड्डी ४३ आणि ध्रुव जुरेल ४४ यांनी चांगली साथ दिली होती.
त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी विंडीजचा पहिला डाव २४८ धावांवर गुंडाळला होता. भारताकडून फिरकीपटू कुलदीप यादवनं विंडीजचा निम्मा संघ गारद केला. त्यानं ८२ धावात ५ बळी टीपले. त्याला रविंद्र जडेजानं ३ तर बुमराह आणि सिराजनं प्रत्येकी १ विकेट घेत चांगली साथ दिली होती.
भारतानं विंडीजला फॉलोऑन दिल्यानंतर विंडीजनं दुसऱ्या डावात भारताला कडवा प्रतिकार केला. भारताला दुसऱ्यांदा फलंदाजी करण्याची गरज लागणार नाही असं वाटत असतानाच विडींजनं दुसऱ्या डावात ३९० धावांपर्यंत मजल मारली.
वेस्ट इंडीजकडून सलामीवीर जॉन कॅम्पबेलनं ११५ तर शाय होपनं १०५ धावांची शतकी खेळी केली. त्यानंतर जस्टिन ग्रेवासनं तळातील फलंदाजांच्या साथीनं भारताला चांगलंच झुंजवलं. जस्टिन ग्रेवासनं नाबाद ५० धावा केल्या तर ११ व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जेडननं ३२ धावांची खेळी केली.
दुसऱ्या डावात देखील कुलदीप यादव टीम इंडियासाठी धावून आला. त्यानं १०४ धावात ३ विकेट्स घेतल्या तर बुमराहनं ३ विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. सिराजनं २ तर जडेजा आणि सुंदरनं प्रत्येकी १ विकेट घेतली.
भारतासमोर विजयासाठी १२० धावांच आव्हान ठेवण्यात आलं. त्यानंतर भारतानं दुसऱ्या डावात ३ फलंदाजांच्या मोबदल्यात हे आव्हान पाचव्या दिवशी पूर्ण केलं. भारताकडून केएल राहुलनं नाबाद ५८ तर साई सुदर्शननं ३८ धावा केल्या. गिल १३ धावा करून बाद झाला. अखेर विजयाची औपचारिकता राहुल आणि ध्रुव जुरेल यांनी पूर्ण केली.