भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर स्मृती मानधना हिने बुधवारी (दि. १७) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुस-या वनडे सामन्यात धमाकेदार वादळी शतकी खेळी साकारली. मुल्लांपूरच्या मैदानावर तिने कांगारू गोलंदाजांची धु धु धुलाई करून चौकार षटकारांचा पाऊस पाडला. मानधनाने ९१ चेंडूंत ११७ धावा फटकावल्या, ज्यात १४ चौकार आणि चार षटकारांचा समावेश राहिला. यासह तिने ७७ चेंडूंमध्ये शतक पूर्ण करून तिने इतिहास रचला. महिलांच्या वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात जलद शतक झळकावणारी ती पहिली खेळाडू ठरली.
या खेळीसह, मानधनाने भारतासाठी दुसरे सर्वात जलद शतकही नोंदवले. भारतासाठी सर्वात जलद शतकाचा विक्रमही मानधनाच्या नावावर आहे. तिने आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात केवळ ७० चेंडूंमध्ये शतक ठोकले होते.
मानधनाने ताहलिया मॅकग्राथच्या २९ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारून आपले १२ वे वनडे शतक साजरे केले. महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ती आता संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. तिने इंग्लंडची फलंदाज टॅमी ब्यूमोंट (१२ शतके) हिची बरोबरी केली.
महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार मेग लॅनिंग हिच्या नावावर आहे. तिने एकूण १५ शतके झळकावली आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडची दिग्गज क्रिकेटपटू सुझी बेट्स असून तिने १३ शतके फटकावली आहेत.
चंदीगढमध्ये झळकावलेल्या या शतकामुळे स्मृती मानधना दोन वेगवेगळ्या संघांविरुद्ध प्रत्येकी किमान तीन-तीन शतके झळकावणारी पहिली फलंदाज ठरली आहे. तिच्यापूर्वी मिताली राजने (श्रीलंकेविरुद्ध ३ शतके) आणि सध्याची कर्णधार हरमनप्रीत कौरने (इंग्लंडविरुद्ध ३ शतके) एकाच संघाविरुद्ध अशी कामगिरी केली होती. मात्र, मानधनाने आता दोन वेगवेगळ्या संघांविरुद्ध हा विक्रम साधला आहे. तिने यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन शतके झळकावली होती आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्धही अशी कामगिरी केली आहे.