Asia Cup Trophy Controversy 
स्पोर्ट्स

Asia Cup Trophy Controversy : "त्यांच्याकडून ट्रॉफी नकोच!" ; भारताने नक्वींना का नाकारलं? BCCI च्‍या सैकियांचा मोठा खुलासा!

भारतीय संघाने नक्‍वींकडून ट्रॉफी न स्वीकारताच पारितोषिक वितरण सोहळा संपला

पुढारी वृत्तसेवा

Asia Cup Trophy India vs Sri Lanka Final : भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हातून महिला आशिया चषक स्वीकारण्यास नकार दिला. गेल्या वर्षी पुरुष संघाने घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा दर्शवत महिला संघानेही हीच भूमिका घेतली आहे, अशी माहिती बीसीसीआयचे (BCCI) सचिव देवजित सैकिया यांनी दिली.

बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपण सर्व देशांविरुद्ध खेळले पाहिजे

रविवाऱ्याच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केल्यानंतर 'आयएएनएस'शी बोलताना सैकिया म्हणाले, "दीड वर्षापूर्वी आपल्या पुरुष संघाने आशिया चषक जिंकला होता. एप्रिल २०२५ च्या पहलगाम घटनेनंतर सर्व परिस्थिती बदलली. त्यानंतर आपल्या शेजारील देशासोबत कोणतेही संबंध ठेवू नयेत आणि त्यांच्यासोबत क्रिकेट खेळू नये, असा दबाव नागरिकांकडून आमच्यावर होता. परंतु बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपण सर्व देशांविरुद्ध खेळले पाहिजे, असे आपल्या सरकारचे धोरण आहे."

पुरुष संघाने घेतलेल्या निर्णयावर महिला संघही ठाम

"पण याचा अर्थ असा नाही की आम्ही आमच्यावर लादलेली प्रत्येक अट मान्य करू. आमचा लष्करी संघर्ष अजूनही सुरू आहे. आपल्या देशाच्या हिताविरोधात काम करणाऱ्या मुख्य नेत्यांपैकी एक असलेल्या व्यक्तीच्या हातून आपण ट्रॉफी स्वीकारू शकत नाही. गेल्या वर्षी पुरुष संघाने घेतलेल्या निर्णयाशी महिला संघाने एकजूट दाखवली आहे," असाही सैकिया यांनी स्‍पष्‍ट केले.

भारताने ट्रॉफी न स्वीकारताच पारितोषिक वितरण सोहळा संपला

यंदा भारताने श्रीलंकेवर ७२ धावांनी सहज विजय मिळवत विक्रमी आठव्यांदा महिला आशिया चषक विजेतेपदावर नाव कोरले. हरमनप्रीत कौर आणि तिच्या सहकाऱ्यांनी मैदानावर जल्लोष केला, मात्र पारितोषिक वितरण समारंभात भारतीय संघाने नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारली नाही. भारताने विजेतेपद पटकावले तेव्हा नक्वी स्टेडियममध्ये उपस्थित होते आणि बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला व सैकिया यांच्यासोबत दिग्गज प्रेक्षकदीर्घेत बसले होते. नंतर त्यांनी मंचावर जाऊन उपविजेत्या श्रीलंकेची कर्णधार चमारी अथापथूकडे चेक सुपूर्द केला. त्यानंतर भारताने त्यांच्याकडून ट्रॉफी न स्वीकारताच हा सोहळा संपला.या निर्णयामुळे संघाच्या कामगिरीचे महत्त्व कमी होत नाही, असे सैकिया यांनी स्पष्ट केले.

आम्हाला याचा कोणताही पश्चात्ताप नाही

ट्रॉफी वितरणाचा वाद सोडवण्याचा प्रयत्न झाला होता, असे सांगत सैकिया म्हणाले, "आम्ही आजची परिस्थिती सोडवण्याचा प्रयत्न केला, पण आमचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. आम्हाला याचा कोणताही पश्चात्ताप नाही. ट्रॉफी कोणी द्यावी यावर लक्ष केंद्रित करणे ही आमची प्राथमिकता नव्हती. भारतीय संघाने जिंकावे अशी आमची इच्छा होती आणि ती आम्ही पूर्ण केली आहे." तसेच नक्वी यांच्याशी झालेली चर्चा ट्रॉफीभोवती केंद्रित नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

२०२५ आशिया चषक फायलनमधील वादाच्‍या आठवणी ताज्‍या

या निर्णयामुळे २०२५ च्या पुरुष आशिया चषक फायनलमधील वादाच्या आठवणी ताज्या झाल्या. अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता, पण खेळाडूंना ट्रॉफी आणि पदके मिळवण्यासाठी तासाभरापेक्षा जास्त वेळ वाट पाहावी लागली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT