india women squads announced for england tour odi and t20i series
भारतीय महिला संघ जूनच्या अखेरीस इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये एकूण 8 सामने खेळवले जातील. पहिला पाच सामन्यांची टी-20 मालिका आणि त्यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाईल. या दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची गुरुवारी (दि. 15) घोषणा करण्यात आली. या दोन्ही मालिकांमध्ये हरमनप्रीत कौर भारतीय संघाचे नेतृत्व करेल, तर स्मृती मानधना उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसेल.
पाच सामन्यांची टी-20 मालिका 28 जूनपासून सुरू होत आहे. तर एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 16 जुलै रोजी खेळला जाईल. सलामीवीर शेफाली वर्मा भारतीय महिला टी-20 संघात पुनरागमन झाले आहे. शेफालीने महिला प्रीमियर लीग (WPL) 2025 मध्ये धडाकेबाज फलंदाजी केली होती. तिने 152.76 च्या स्ट्राईक रेटने 304 धावा फटकावल्या होत्या. अष्टपैलू स्नेह राणा हिचा देखील टी-20 संघात समावेश करण्यात आला आहे. ही अनुभवी ऑफ-स्पिनर जुलै 2023 पासून भारतासाठी या फॉरमॅटमध्ये खेळलेली नाही. शिवाय, मुंबईची वेगवान गोलंदाज सायली सातघरे हिला स्थानिक क्रिकेटमधील तिच्या उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. सायलीला एकदिवसीय आणि टी-20 दोन्ही संघात स्थान मिळाले आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे वेगवान गोलंदाज रेणुका सिंह आणि ऑफस्पिनर श्रेयंका पाटील यांना संघात स्थान मिळाले नाही. असे असले तरी त्यांच्याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. अलिकडच्या काळात भारताची आघाडीची वेगवान गोलंदाज राहिलेली रेणुका सिंह ही दुखापतींशी झुंजत आहे. तिच्या खांद्याच्या शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दुसरीकडे, श्रेयंका पाटीलने स्थानिक क्रिकेट आणि WPL मध्ये चांगली कामगिरी केली होती, परंतु तिला दोन्ही संघांमधून वगळण्यात आले आहे.
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, नल्लापुरेड्डी चरणी, शुचि उपाध्याय, अमनज्योत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, सायली सातघरे.
पहिला टी-20 : 28 जून, नॉटिंगहॅम
दुसरा टी-20 : 1 जुलै, ब्रिस्टल
तिसरा टी-20 : 4 जुलै, द ओव्हल
चौथा टी-20 : 9 जुलै, मँचेस्टर
पाचवा टी-20 : 12 जुलै, बर्मिंगहॅम
पहिला एकदिवसीय सामना : 16 जुलै, साउथहॅम्प्टन
दुसरा एकदिवसीय सामना : 19 जुलै, लॉर्ड्स
तिसरा एकदिवसीय सामना : 22 जुलै, चेस्टर-ले-स्ट्रीट