India Vs Sri Lanka Super Over Controversy :
आशिया कप सुपर ४ मधील शेवटच्या सामन्यात भारतानं श्रीलंकेचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. या सामन्यात दोन्ही संघ तुल्यबळ दिसले. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेला फक्त २ धावाच करता आल्या. त्यामुळं भारताचं विजय मिळवण्याचं काम सोपं झालं. मात्र याच सुपर ओव्हरमध्ये एक वाद देखील उद्भवला.
सुपर ओव्हरमधील वादाचा केंद्रबिंदू ठरला तो दासून शनका! सुपर ओव्हरमध्ये श्रीलंका फलंदाजी करण्यासाठी आला. हे षटक भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह टाकत होता. षटकातील चौथ्या चेंडूवर शनका गंडला. भारतीय खेळाडूंनी झेलबादची अपील केली. त्यानंतर अंपायरनं शनकाला बाद ठरवलं.
याचवेळी शनका धाव घेण्यासाठी पुढं सरसावला होता. त्यावेळी विकेटकिपर संजू सॅमसननं थेट फेकी करत त्याला धावबाद केलं होतं. दरम्यान, अंपायरच्या झेलबाद निर्णयाला शनकानं तिसऱ्या अंपायरकडं आव्हान दिलं. यात अल्ट्रा एजमध्ये शनका धावबाद नसल्यांच निष्पन्न झालं. त्यामुळं पंचांना आपला झेलबादचा निर्णय माघारी घ्यावा लागला.
अन् इथं वादाची ठिणगी पडली. जर शनका झेलबाद अपीलमध्ये नाबाद ठरला असला तरी तो पुढं धावबाद झाला होता. मात्र पंचांनी त्याला नाबादच ठरवलं कारण अंपायरनं पहिल्यांदा त्याला झेलबाद ठरवलं होतं मात्र तो अल्ट्रा एजमध्ये तो नाबाद असल्याचं दिसलं. हाच निर्णय ग्राह्य धरण्यात आला अन् त्यानंतर भारतीय संघानं अंपायरभोवती एकच गलका केला.
या सगळ्या वादानंतर भारतानं हा सामना लिलया जिंकला. मात्र श्रीलंकेचा कोच सनथ जयसूर्यानं या वादाबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानं हा वाद नियमामुळं झाल्याचं सांगितलं. त्यानं आयसीसीनं हा नियम सुधारण्याची गरज असल्याचं देखील सांगितलं.
तो म्हणाला, 'नियमानुसार अंपायरनं दिलेला पहिला निर्णयच ग्राह्य धरण्यात येतो. शनकाला झेलबाद ठरवल्यानंतर चेंडू डेड होतो. त्यानंतर रिव्ह्यूमध्ये हा झेलबादचा निर्णय बदलला. मात्र मला असं वाटतं की अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून नियमात सुधारणा करण्याची गरज आहे.
मेलबर्न क्रिकेट क्लबच्या नियम 20.1.1.3 नुसार फलंदाजाला बाद ठरवल्या ठरवल्या चेंडू डेड होतो. त्यामुळं संजू सॅमसनने जरी धावबाद केलं असलं तरी त्याच्या आधीच अंपायरनं शनकाला बाद ठरवले होतं. त्यामुळं तिथं चेंडू डेड झाला अन् शनका थोडक्यात वाचला.
सनथ जयसूर्यानं शतकवीर फलंदाज निसंका सुपर ओव्हरमध्ये का फलंदाजीला आला नाही याबाबत देखील स्पष्टीकरण दिलं. तो म्हणाला की गेल्या दोन सामन्यापासून निसंकाच्या मांडीचा स्नायू दुखावला होता. त्यामुळे तो पूर्णपणे फिट नव्हता. संघाला त्याच्या बाबतीत कोणतीही जोखीम घ्यायची नव्हती. त्याचबरोबर लेफ्ट आणि राईट कॉम्बिनेशन ट्राय करण्यासाठी त्याला फलंदाजीला उतरवलं नाही.