

बंगळूर; वृत्तसंस्था : ‘आयसीसी’ महिला क्रिकेट विश्वचषकात विजेतेपद आपल्याकडेच कायम राखण्याच्या मोहिमेला प्रारंभ करण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाची कर्णधार अॅलिसा हिली हिने यंदाचा विश्वचषक आम्ही आजवर खेळलेल्यांपैकी सर्वात कठीण, आव्हानात्मक विश्वचषक असेल, अशी प्रांजळ कबुली दिली. आगामी ‘आयसीसी’ महिला विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आयोजित सहभागी सर्व कर्णधारांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ती बोलत होती.
‘आयसीसी’च्या प्रसिद्धीपत्रकानुसार, हिली म्हणाली, विजेतेपद कायम राखणेे सोपे नसते. मला वाटते की, प्रत्येक संघ इथे विश्वचषक जिंकण्यासाठीच आला आहे. आम्हाला हे विजेतेपद मिळवण्यासाठी अर्थातच प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. आम्ही या आव्हानासाठी उत्सुक आहोत. मला विश्वास आहे की, हा विश्वचषक आमच्यासाठी सर्वात कठीण असेल. ऑस्ट्रेलियाचा या फॉरमॅटमध्ये आणि विश्वचषकांमध्ये समृद्ध इतिहास आहे. परंतु, मला वाटते की, यावेळी प्रत्येक संघाला हरवणे सोपे नसेल.