

दुबई; वृत्तसंस्था : रोमांचक सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या शेवटच्या सुपर-4 सामन्यात भारताने लंकेला चीत करत प्रतिस्पर्ध्यांचा संघर्ष संपुष्टात आणला. प्रारंभी 20 षटकांची लढत टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरचा अवलंब करण्यात आला. यात लंकेचे दोघे फलंदाज दोनच धावांवर बाद झाले, तर प्रत्युत्तरात सूर्यकुमारने पहिल्याच चेंडूवर 3 धावा वसूल करत लंकेचे सामन्यातील आव्हान संपुष्टात आणले.
प्रारंभी, 20 षटकांच्या लढतीत भारताने 5 बाद 202 धावांचा डोंगर रचल्यानंतर लंकेनेदेखील 20 षटकांत 5 बाद 202 धावाच केल्या आणि हा सामना रोमांचकरीत्या टाय केला होता. विजयासाठी 203 धावांचे आव्हान असताना श्रीलंकेने षटकामागे 10 च्या सरासरीने फटकेबाजी सुरू ठेवत भारतीय गोलंदाजांवर बरेच दडपण निर्माण केलेे. पथूम निसांका (58 चेंडूंत 107) व कुशल परेराचा वाटा यात सिंहाचा राहिला. कुशल परेरा 32 चेंडूंत 58 धावांवर बाद झाला असला, तरी 181.25 च्या स्ट्राईक रेटने त्याने केलेली फटकेबाजी लक्षवेधी ठरली. निसांकानेही जवळपास प्रत्येक चेंडूवर तुटून पडण्याचा सिलसिला कायम ठेवत आगेकूच सुरूच ठेवली. या लढतीत कुशल मेंडिस गोल्डन डकचा मानकरी ठरला, तर परेराला वरुणने सॅमसनकरवी यष्टीचीत केलेे.
तत्पूर्वी, अभिषेक शर्मा (61), तिलक वर्मा (49) व संजू सॅमसन (39) यांच्या फटकेबाजीमुळे भारताने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 202 धावांचा डोंगर उभारला. या स्पर्धेत कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. अभिषेकने केवळ 31 चेंडूंत 61 धावा फटकावताना 8 चौकार 2 उत्तुंग षटकार फटकावले. या स्पर्धेत अभिषेकने पॉवरप्लेमध्ये गोलंदाजांवर सातत्याने आक्रमणे केली असून, येथे त्याने अर्धशतकांची हॅट्ट्रिकही साजरी केली.
असतानाही, शुक्रवारी त्याने आपल्या खेळीत आठ चौकार आणि दोन षटकार लगावले. श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असलंकाच्या चेंडूवर तो डीप मिड-विकेट बाऊंड्रीवर झेल देऊन बाद झाला. गिलला (4) तिक्षणाने टाकलेला चेंडू हळू आल्याने त्याचा बॅटचा लीडिंग एज लागला आणि तिक्षणानने त्याचा झेल घेतला. फॉर्मसाठी झगडत असलेला कर्णधार सूर्यकुमार यादवने (12) स्वीप शॉट मारून अडचणीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला; पण वानिंदू हसरंगाने त्याला पायचीत केले होते.
अंतिम क्षणी लंकेला विजयाने हुलकावणी दिली असली, तरी त्यांनी टाय संपादन करत भारताला निर्णायक फायनलपूर्वी एका अर्थाने वेकअप कॉलच दिला आहे. पाकिस्तानविरुद्ध निर्णायक फायनलमध्ये कोणत्याही आघाडीवर गाफिल राहून चालणार नाही, हेच या लढतीतून अधोरेखित झाले.
निर्धारित 20 षटकांच्या लढतीत विजयासाठी 203 धावांचे आव्हान असताना कुशल मेंडिस (0), असलंका (5), कमिंदू (3) स्वस्तात बाद झाले. मात्र, एका बाजूने सातत्याने गडी बाद होत असताना निसांकाने 107 धावा फटकावत संघर्ष कायम ठेवला होता. निसांका अखेर शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर बाद झाला.
लंकेला या लढतीत शेवटच्या 2 षटकांत 23 धावांची आवश्यकता होती. यापैकी अर्शदीपच्या डावातील 19 व्या षटकात 11 धावा वसूल केल्या गेल्या आणि यासह शेवटच्या षटकात 12 धावांची गरज, असे नवे समीकरण होते. हर्षितच्या शेवटच्या षटकात निसांका पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. मात्र, शेवटच्या चार चेंडूंत लंकेने 11 धावा वसूल केल्याने हा सामना टाय झाला होता. षटकातील शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज असताना शनाकाने 2 धावा घेत सामन्यात लंकेला बरोबरी मिळवून दिली.