IND vs SL 1st Test Day 1 : देवदत्त पडिक्कलने शानदार शतकी खेळी केली.  
स्पोर्ट्स

IND vs SL 1st Test Day 1 : देवदत्त पडिक्कलचे दमदार शतक; पहिल्या दिवशी भारत मजबूत स्थिती

केएल राहुलचीही अर्धशतकी खेळी, भारतीय संघाची २ बाद २८८ धावांपर्यंत मजल

पुढारी वृत्तसेवा

India vs Sri Lanka 1st Test Day 1 : देवदत्त पडिक्कलच्या नाबाद शानदार शतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी आपली पकड मजबूत केली आहे. शनिवारी पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने २ बाद २८८ धावांपर्यंत मजल मारली. पडिक्कल १३१ धावांवर नाबाद असून त्याला ऋषभ पंत २७ धावांवर साथ देत आहे. या दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी झाली आहे.

पडिक्कलचे पहिले आंतरराष्ट्रीय शतक

कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या देवदत्त पडिक्कलने आपल्या कारकीर्दीतील पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठोकत ही खेळी संस्मरणीय ठरवली. त्याने १३४ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले आणि दिवसभरात श्रीलंकेच्या गोलंदाजांवर सातत्याने दबाव कायम ठेवला. २६ वर्षीय पडिक्कलने आपल्या खेळीत अनेक नयनरम्य फटके मारले. विशेषत: फिरकीपटूंविरुद्ध तो अधिक आक्रमक पवित्र्यात दिसला. त्याने ८१ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले होते. यानंतर त्‍याने सुरेख फटकेबाजी करत धावफलक हलता ठेवला. कुमाराच्या गोलंदाजीवर मिड-ऑफच्या दिशेने एक धाव घेत त्याने शतकाला गवसणी घातली.

पडिक्कलची राहुलसोबत दीडशे धावांची भागीदारी

पडिक्कलने दुसऱ्या विकेटसाठी केएल राहुलसोबत १५० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. राहुलने १६२ चेंडूंमध्ये ७७ धावांचे योगदान दिले आणि नेहमीप्रमाणे संयमी फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने जयसूर्याला मारलेला सरळ षटकार प्रेक्षणीय होता. मात्र, शेवटच्या सत्रात स्नायूंच्या ताणामुळे रिटायर्ड हर्ट होऊन मैदान सोडावे लागले. राहुल माघारी परतल्यानंतर क्रीझवर आलेल्या ऋषभ पंतने पडिक्कलच्या साथीने भारतीय डाव सावरला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत या जोडीने श्रीलंकेला आणखी एकही यश मिळू दिले नाही.

पावसाचा व्यत्यय

पहिल्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे सुमारे १ तास २० मिनिटांचा खेळ वाया गेला. असे असूनही भारतीय फलंदाजांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांना फारशा संधी दिल्या नाहीत. गॉलची पट्टी फलंदाजीसाठी अनुकूल ठरत होती, ज्याचा पूर्ण फायदा भारतीय फलंदाजांनी घेतला.

जायसवाल, गिल स्वस्तात बाद

डावाच्या सुरुवातीला भारताला यशस्वी जायसवालच्या रूपाने पहिला धक्का बसला. धाव घेण्याच्या घाईत राहुल आणि जायसवाल यांच्यात ताळमेळ बिघडला आणि दोघेही एकाच टोकाला पोहोचले. गोलंदाजाशी धडक झाल्याने संतुलन गमावलेला जायसवाल ३७ धावांवर (३२ चेंडू) दुर्दैवीरीत्या धावबाद झाला. त्यानंतर कर्णधार शुभमन गिलला प्रभात जयसूर्याने आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढले. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात गिल मिड-ऑफला सोपा झेल देऊन बाद झाला. मात्र, त्यानंतर श्रीलंकेला संपूर्ण दिवसभरात एकही गडी बाद करता आला नाही.

श्रीलंकेचे गोलंदाज प्रभावहीन

भारतीय फलंदाजांनी श्रीलंकेच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. पदार्पण करणाऱ्या केशरा नुवंथा या ऑफ-स्पिनरने सुरुवातीला पडिक्कलला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला; त्याचा एक बाहेरील कडा घेतलेला चेंडू स्लिपच्या पुढे पडला. पण त्यानंतर पडिक्कलने त्याला चौकार ठोकत गोलंदाजावर दबाव आणला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT