Guwahati Pitch Report:
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी कोलकाता येथील इडन गार्डनवर झाली होती. हा सामना अवघ्या अडीच दिवसात संपला. मात्र या सामन्याचा निकाल भारताच्या विरूद्ध लागला. दक्षिण अफ्रिकेच्या फिरकीपटूंनी भारतीय फलंदाजांच्या नाकात दम केला होता. अवघ्या १२३ धावांचे आव्हान देखील भारतीय संघाला पेलवलं नाही. संपूर्ण संघ ९३ धावात पॅव्हेलियनमध्ये पोहचला.
या सामन्यानंतर कोलकात्यातील खेळपट्टीवर खूप टीका झाली होती. दरम्यान, सौरव गांगुलीनं टीम इंडियाच्या मागणीनुसारच खेळपट्टी देण्यात आल्याचं सांगितलं. यानंतर टीम इंडियाच्या रणनितीवर अन् फिरकी खेळण्याच्या तंत्रावर टीका होऊ लागली. आता २२ नोव्हेंबर रोजी गुवाहाटीत टीम इंडिया दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. त्याच्या खेळपट्टीची आतापासून चर्चा होत आहे.
कोलकात्यात टीम इंडियानं फिरकीला पोषक खेळपट्टी तयार करण्याची मागणी केली होती. ही रणनिती अंगलट आल्यानंतर आता टीम इंडियाने गुवाहाटीमध्ये खेळपट्टी ही फलंदाजीला पोषक असावी अशी विनंती केल्याचं बोललं जात आहे.
गुवाहाटीमध्ये खेळपट्टी तयार करताना लाल मातीचा वापर केल्याची माहिती मिळत आहे. या खेळपट्टीवर चेंडू उसळी घेईल अन् वेगानं येईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आशिष भौमिक हे बारसपारा क्रिकेट स्टेडियमचे मुख्य क्युरेटर आहेत. ते बीसीसीआयचे देखील मुख्य क्युरेटर आहेत. त्यांना टीम इंडियाची खेळपट्टीबाबतची विनंती कळवण्यात आली आहे.
सामन्याच्या ४८ तास आधी गुवाहाटीच्या खेळपट्टीची पहिली झलक समोर आला होती. सध्या तरी मधल्या भागात दाट गवत आहे. त्याचबरोबर सामन्यासाठी शक्यतो लाल मातीतील खेळपट्टीच असण्याची शक्यता आहे. लाल मातीतील खेळपट्टी ही वेग आणि उसळीसाठी प्रसिद्ध असते.
काळ्या मातीतील खेळपट्टीसारखी ही खेळपट्टी फुटत नाही. मात्र याचा अर्थ ती फिरकीला साथ देणार नाही असं नाही. जर खेळपट्टीवर जास्त गवत ठेवलं तर जसजशी कसोटी पुढे सरकेल तसतसे भारतीय फिरकीपटू सामन्यावर अधिराज्य गाजवू शकतील. जर गवत कापून टाकलं तर फिरकीपटू पहिल्या दोन तीन दिवसातच मोठी भूमिका बजावू शतकात.
अशा परिस्थितीत जरी खेळपट्टी फलंदाजांसाठी फार चांगली नसली तरी कोलकाता कसोटीसारखी अवस्था होणार नाही. विशेष म्हणजे गुवाहाटीमधील हा पहिला कसोटी सामना आहे. त्यामुळं बीसीसीआय या मैदानाची प्रतिमा वाईट होईल अशी खेळपट्टी तयार करणार नाही. त्यामुळं दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी बॅट आणि बॉलचं संतुलन साधणारी खेळपट्टी मिळण्याची शक्यता अधिक आहे.