India Pakistan Match February 15: क्रिकेट चाहत्यांसाठी 15 फेब्रुवारी हा दिवस खूपच खास आहे. कारण याच दिवशी भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. विशेष बाब म्हणजे, या दिवशी भारत-पाकिस्तानचे एक नव्हे तर दोन सामने पाहायला मिळणार आहेत. पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या वेळेत हे सामने होणार आहेत.
एका बाजूला ICC Men's T20 World Cup 2026 मध्ये दोन्ही देशांच्या वरिष्ठ संघांमध्ये महामुकाबला रंगणार आहे. हा सामना कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियम येथे सायंकाळी 7 वाजल्यापासून खेळला जाणार आहे. ग्रुप स्टेजमधील हा सामना असल्याने दोन्ही संघ पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार असून, आधीपासूनच या लढतीबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
याच दिवशी महिला क्रिकेटमध्येही भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. ACC Women's Asia Cup Rising Stars 2026 अंतर्गत इंडिया ए आणि पाकिस्तान ए या संघांमध्ये सामना होणार असून, हा सामना बँकॉकमधील तेर्डथाई क्रिकेट ग्राऊंड येथे दुपारी 12:30 वाजता सुरू होईल. ही स्पर्धा नवीन खेळाडूंना मोठं व्यासपीठ देणारी मानली जाते आणि भविष्यातील स्टार्स इथेच घडताना दिसतात.
एशिया कप राइजिंग स्टार्स स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी झाले आहेत. इंडिया ए, पाकिस्तान ए, बांगलादेश ए, श्रीलंका ए, यूएई, नेपाळ, मलेशिया आणि थायलंड. या संघांना दोन गटांत विभागण्यात आलं असून प्रत्येक गटात चार संघ आहेत. ग्रुप ए मध्ये इंडिया ए सोबत पाकिस्तान ए, यूएई आणि नेपाळ यांचा समावेश आहे. प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध खेळेल आणि प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील.
15 फेब्रुवारी हा दिवस क्रिकेट प्रेमींसाठी खास असणार आहे. दुपारी महिला क्रिकेटमधील खेळाडूंची लढत आणि संध्याकाळी पुरुष टी20 विश्वचषकातील हाय-व्होल्टेज भारत-पाकिस्तान सामना, अशा दुहेरी थरारामुळे चाहत्यांसाठी हा खऱ्या अर्थाने “सुपर संडे” ठरणार, यात शंका नाही.