स्पोर्ट्स

IND vs NZ ODI : टीम इंडियाला 'धक्का! वॉशिंग्टन सुंदर मालिकाबाहेर, गौतम गंभीरच्या लाडक्या शिष्याची संघात एन्ट्री

दिल्लीच्या एका स्फोटक फलंदाजाला संघात स्थान देण्यात आले आहे.

रणजित गायकवाड

IND vs NZ ODI Washington Sundar ruled out Ayush Badoni replacement

राजकोट : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात मिळवलेल्या विजयाचा आनंद ओसरत नाही तोच भारतीय क्रिकेट संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. स्टार ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर फेकला गेला आहे. हा भारतासाठी मोठा धक्का मानला जात असून, त्याच्या जागी दिल्लीच्या एका स्फोटक फलंदाजाला संघात स्थान देण्यात आले आहे.

मैदानात वेदना सोसल्या, तरीही विजयासाठी बॅट हाती घेतली

वडोदरा येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात गोलंदाजी करत असताना वॉशिंग्टन सुंदरच्या बरगड्यांच्या खालच्या भागात अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या. या त्रासामुळे त्याने केवळ ५ षटके टाकली आणि तो मैदानाबाहेर गेला. मात्र, संघाला गरज असताना त्याने दुखापतीकडे दुर्लक्ष करत ८ व्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याचे धाडस दाखवले आणि नाबाद ७ धावा करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, सुंदरला आता पुढील स्कॅन आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी पाठवण्यात आले असून तो या मालिकेतील पुढील दोन सामन्यांना मुकणार आहे.

गौतम गंभीरच्या 'फेव्हरेट' खेळाडूला लॉटरी

सुंदरच्या जागी दिल्लीचा युवा आणि गुणवान खेळाडू आयुष बदोनी याला भारतीय संघात पाचारण करण्यात आले आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा लाडका खेळाडू म्हणून बदोनीची ओळख आहे. आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्ससाठी खेळताना बदोनीने आपल्या फिनिशिंग टचने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

बदोनीची आकडेवारी

  • २१ प्रथम श्रेणी सामन्यात ४ शतकांसह १६८१ धावा आणि २२ बळी.

  • लिस्ट ए (एकदिवसीय) क्रिकेटमध्ये २७ सामन्यात ६९३ धावा आणि १८ बळी.

दुखापतींचे सत्र थांबेना; टीम इंडियाची डोकेदुखी वाढली

न्यूझीलंडविरुद्धची ही मालिका सुरू झाल्यापासून भारतीय खेळाडूंच्या दुखापतींनी निवड समितीची झोप उडवली आहे.

  • ऋषभ पंत : यष्टिरक्षक फलंदाज पंत मालिकेच्या एक दिवस आधीच दुखापतीमुळे बाहेर झाला.

  • तिलक वर्मा : शस्त्रक्रियेमुळे हा खेळाडू आगामी टी-२० मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी उपलब्ध नसेल.

  • वॉशिंग्टन सुंदर : बरगड्यांच्या दुखापतीमुळे आता वनडे मालिकेतून बाहेर.

पुढील प्रवास राजकोट आणि इंदूरकडे

पहिला सामना जिंकून भारताने १-० अशी आघाडी घेतली असली तरी, दोन महत्त्वाच्या खेळाडूंची उणीव भासणार आहे. मालिकेतील दुसरा सामना १४ जानेवारीला राजकोटमध्ये तर तिसरा सामना १८ जानेवारीला इंदूरमध्ये रंगणार आहे. आता आयुष बदोनीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

भारताचा सुधारित एकदिवसीय संघ

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, के.एल. राहुल (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), आयुष बदोनी, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंह, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT